... तर शेतकरी असंतोषाचे नेतृत्व आम्हाला करावे लागेल, उदयनराजेंचा सरकारला इशारा
एबीपी माझा वेब टीम | 01 Nov 2019 10:57 PM (IST)
ऑगस्ट महिन्यात राज्यातील काही भागात विशेष करुन, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये फार मोठा पूर आला. त्यामुळे शेतीसह जनावरं आणि शेतकऱ्यांच्या साधन संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. या पूरपरिस्थितीचे वेळी सार्वत्रिक निवडणुका लागल्यामुळे नुकसान भरपाईचा प्रश्न अधांतरी राहिला.
सातारा : कोलमडलेल्या शेतकरी राजाला शासनाने योग्य ती मदत देवून धीर द्यावा, अशी मागणी माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे. या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर शेतकऱ्यांच्या असंतोषामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. बळीराजा आमच्या जीवाभावाचा असल्याने उभ्या महाराष्ट्रातील शेतकरी असंतोषाचे नेतृत्व वेळप्रसंगी आम्हाला करावे लागले तरी आम्ही करु असाही इशारा त्यांनी दिला आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूरस्थिती इत्यादीमुळे ग्रामीण भागात झालेल्या शेती आणि व्यवसायाचे झालेले नुकसान एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून, नुकसान भरपाईचा कायदा आणि योग्य ती आर्थिक तरतूद करुन एका महिन्याच्या आत करण्यात यावी. विमा योजना तातडीने लागू करावी, अशी मागणीही उदयनराजे यांनी केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी ऑगस्ट महिन्यात राज्यातील काही भागात विशेष करुन, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये फार मोठा पूर आला. त्यामुळे शेतीसह जनावरं आणि शेतकऱ्यांच्या साधन संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. या पूरपरिस्थितीचे वेळी सार्वत्रिक निवडणुका लागल्यामुळे नुकसान भरपाईचा प्रश्न अधांतरी राहिला. आता वादळ, चक्रीवादळ, हवामान बदलामुळे मान्सूनचा परतीचा पाउस मुक्काम करुन राहिला आहे. हाता तोंडाला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर खरिपाची पिकेही गेली आहेत. ग्रामीण भागातील सर्व छोटे व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या उध्वस्त झाल्याने त्यांचा धंदा बसला आहे. जी गोष्ट पिकांची तीच जनावरांची झाली. ग्रामीण भाग उध्वस्त झाला आहे. आम्ही दहा वर्षापासून मागणी करत असलेली विमा योजनेची जर अंमलबजावणी झाली असती तर शेतकऱ्यांना मदतीसाठी केंद्र व राज्य सरकारकडे हात पसरावे लागले नसते, असेही उदयनराजे यांनी म्हटलं आहे. यामुळे आता शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर शेतकऱ्यांच्या असंतोषामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. बळीराजा आमच्या जीवाभावाचा असल्याने उभ्या महाराष्ट्रातील शेतकरी असंतोषाचे नेतृत्व वेळप्रसंगी आम्हाला करावे लागले तरी आम्ही करु असाही इशारा त्यांनी दिला आहे.