Maharashtra Govt Formation LIVE | नव्या मंत्रिमंडळाची बैठक संपली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रीमंडळ सदस्य आणि अजित पवारांचीही उपस्थिती
महाराष्ट्राला 20 वर्षांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या रुपाने ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती निवडणूक लढली तर उद्धव ठाकरेंच्या रुपाने ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती आता राज्याचा कारभार चालवणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शपथविधी आज शिवतीर्थावर पार पडणार आहे. यासाठी शिवाजी पार्कवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. शपथविधीसाठी शिवाजी पार्कवर कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी भव्य सेट उभारला आहे. आज शिवतीर्थावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या भव्य मंचाची एक झलक
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शपथविधी आज शिवतीर्थावर पार पडणार आहे. यासाठी शिवाजी पार्कवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. शपथविधीसाठी शिवाजी पार्कवर कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी भव्य सेट उभारला आहे. आज शिवतीर्थावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या भव्य मंचाची एक झलक
पार्श्वभूमी
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या रुपाने महाराष्ट्राला आज (28 नोव्हेंबर) नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी शिवतीर्थावर अर्थात शिवाजी पार्कवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठाकरे घराण्यातली पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. शिवसेना आज याठिकाणी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकासआघाडीच्या तीन पक्षांमधील प्रत्येकी दोन आमदारही आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण मंत्रीपदाची शपथ घेतील.
काँग्रेस-राष्ट्रवादीला कोणती खाती?
उद्धव ठाकरेंचं सरकार येत असलं, तरी मंत्रीमंडळाचा विस्तार मात्र 3 डिसेंबरनंतर होणार आहे. महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये 5 वर्षांसाठी उपमुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा असणार आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटील यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. तर विधानसभा अध्यक्ष 5 वर्षांसाठी काँग्रेसला मिळणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभेचं अध्यक्षपद सोपवण्याची शक्यता आहे. याशिवाय विधानसभा उपाध्यक्षपद मिळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं आहे. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये काल (27 नोव्हेंबर) रात्री तब्बल चार तास महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे आणि राज्यातले इतर महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेलांनी ही माहिती दिली आहे.
कोणाकोणाला निमंत्रण?
युवासेनाप्रमुख आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी काल प्रत्यक्ष भेट घेऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना शपथविधीचं निमंत्रण दिलं आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि शपथविधीचं निमंत्रण दिलं. तर, उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना शपथविधी सोहळ्याचं फोनवरुन निमंत्रण दिल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय विविध राज्यांमधील काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना बोलावल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. तसंच द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
400 शेतकऱ्यांसह आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना कुटुंबियांनाही निमंत्रण
उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तब्बल 400 शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. तसंच राज्यातील अनेक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनादेखील निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित करुन आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान करु इच्छितो, असं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं.
पायी वारी करणाऱ्या शेतकरी दाम्पत्याला बोलावणं
यासोबतच शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून अनवाणी चालत विठुरायाला साकडं घालणाऱ्या शेतकरी दाम्पत्यालाही शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील बनाळी येथील शेतकरी संजय सावंत आणि त्यांच्या पत्नी रुपाली यांनी शिवसेनेचा आणि तेही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बनाळीपासून पंढरपूरपर्यंत अनवाणी चालत येऊन देवाला नवस केला होता. सांगलीच्या जत तालुक्यातील बनाळी येथील शेतकरी संजय सावंत आणि त्यांच्या पत्नी रुपाली यांनी शिवसेनेचा आणि तेही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बनाळीपासून पंढरपूरपर्यंत अनवाणी चालत येऊन देवाला नवस केला होता.
मुंबई पोलिसांच्या सूचना
दरम्यान आजच्या शपथविधीसाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर येणार आहे. या पार्श्वभूमी मुंबई पोलिसांनी नागरिक, मान्यवर व्यक्ती, राजकीय नेते, पत्रकार, शेतकऱ्यांसाठी सूचना जारी केली आहे.
संबंधित बातम्या
- शपथविधीसाठी पंतप्रधानांसह, सोनिया गांधी, मनमोहन सिहांना आमंत्रण, मोदींच्या ठाकरेंना फोनवरुन शुभेच्छा
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -