मुंबई: संसदेत झालेल्या घटनेवरून राज्यातील सभागृहात ठराव मांडण्यात येत होता, त्याला विरोध केल्यानंतर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यावर एकतर्फी कारवाई करण्यात आली, मग सुधीर मुनगंटीवारांनी (Sudhir Mungantiwar)  बहीण-भावाच्या नात्यावर अपशब्द वापरल्यानंतर त्यांच्यावर का कारवाई करण्यात आली नव्हती असा सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मी माफी मागतो असंही उद्धव ठाकरे म्हणाले. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर अपशब्द वापरल्याबद्दल पाच दिवसांची निलंबनाची कारवाई केली. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली. 


उद्धव ठाकरे म्हणाले की, "अंबादास दानवे यांनी जो शब्द वापरला त्याबद्दल मी माता भगिनींची माफी मागतो, पण सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभेच्या प्रचारात माता भगिनींचा जो अपमान केला, बहीण भावाच्या नात्यावर त्यांनी जे वक्तव्य केलं त्यावर ते माफी मागणार का? एका भगिनीवर अन्याय केल्यानंतर आम्ही ज्याला मंत्रिमंडळातून काढलं तो व्यक्ती तुमच्या मंत्रिमंडळात आहे, सुप्रिया सुळे याना शिव्या घालणारा तुमच्या मंत्रिमंडळात आहे, त्यावर काय बोलणार?"


जय संविधान म्हटल्यावर यांना मिरच्या झोंबल्या


हिंदुत्व म्हणजे भाजप नव्हे, राहुल गांधींनी तेच ठासून सांगितलं, पण त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला आणि त्यावरून राज्यातील सभागृहात ठराव मांडण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. या ठरावाला विरोध केल्यानंतरच अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचंही त्यांनी म्हटलं. संसदेत ज्यांना जय संविधान म्हटल्यावर मिरच्या झोंबल्या त्यांच्याकडून सभागृहातील आवाज दाबला जात असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. 


उद्धव ठाकरे म्हणाले की भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर एकतर्फी कारवाई केली, पण लोकसभेच्या प्रचारावेळी राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बहीण-भावाच्या संबंधाबद्दल अपशब्द वापरले त्यावर काय कारवाई करणार?


अंबादास दानवे यांच्यावर सूडाने कारवाई


अंबादास दानवे यांच्यावर सूड बुद्धीने कारवाई केल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निलंबन झाले. पण त्यावर चर्चा व्हायला हवी होती. त्यावर एकतर्फी निर्णय झाला. एका कुणाकडून तरी निर्णय झाला आणि तसा निर्णय झाला. अंबादास दानवेंना माफीची संधी द्यायला हवी होती. पण तसं झालं नाही. महाराष्ट्रातील जनता हे उघड्या डोळ्याने पाहते. विधानपरिषदेमध्ये आम्हाला मिळालेल्या यशानंतर ही सूड बुद्धीने कारवाई करण्य़ात आली. राज्यातील मूळ मुद्दे बाजूला ठेऊन त्यावरून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. 


संसदेत झालेल्या गोष्टीवर राज्यात ठराव आणला जात होता, त्याचा काही संबंध आहे का असं दानवे यांनी विचारलं. हिंदुत्वाचा अपमान कुणीही करू शकत नाही, ते सहनही करणार नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही असं राहुल गांधी म्हणाले होते. अपुऱ्या माहितीच्या अधारावर हा ठराव आणला जात होता असं उद्धव ठाकरे म्हणाले. 


विधानपरिषदेच्या तीनही जागा जिंकणार


राज्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी महाविकास आघाडीने तीन उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. हे तीनही उमेदवार आम्ही निवडून आणणार असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. 


ही बातमी वाचा: