शिर्डी : उद्धव ठाकरे गोंधळलेला माणूस असून या वर्षीचा "मोस्ट कन्फ्यूज्ड पॉलिटिशयन अॅवार्ड" त्यांना दिला जावा, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. आम्ही सत्तेसाठी लाचार नाही, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी शिर्डीमधील सभेत केलं होतं. या विधानाचा राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाचार घेतला आहे.
आज पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ करण्यात आला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेना पक्ष हाच मोठा जुमला
सरकारमध्ये राहून निर्णय घेण्याची क्षमता शिवसेनेत नाही. 'जुमलेबाज सरकार' म्हणणारा शिवसेना पक्ष हाच मोठा 'जुमला' असून, सत्तेत राहून शिवसेनेचं केवळ मलिदा खाण्याचं काम सुरु आहे, अशी विखे-पाटील केलं आहे. विरोधी पक्षनेता म्हणून मी काय काम करावं हे तुम्ही सांगायची गरज नाही. शिवसेनेने आपला स्वाभिमान केव्हाच गमावला असून थोडा जरी स्वाभिमान तुमच्यात शिल्लक असेल तर सत्तेतून बाहेर पडा, असं आव्हान त्यांनी दिलं आहे. शिवाय या वर्षीचा "मोस्ट कन्फ्यूज्ड पॉलिटिशयन अॅवार्ड" उद्धव ठाकरे यांना दिला जावा, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
नितीन गडकरींना टोला
मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा माझ्यावर ही टीका झाली. त्यावेळी ज्यांनी माझ्यावर आरोप केली, त्यांची मुलं नंतर राजकारणात आली. मात्र कर्तृत्व सिद्ध केल्यावरच पक्ष त्यांना स्वीकारतो. काहींच्या मुलांमध्ये दोष असेल तर त्याला नाईलाज आहे, असं टोला त्यांनी नितीन गडकरींना नाव न घेता लगावला. राजकारणी घराण्यातील पीढी सक्षम असेल तर जनता स्वीकारते, असं मतही त्यांनी घराणेशाहीबाबत व्यक्त केलं.
पाणीप्रश्न सुटण्याऐवजी जटील झाला आहे
कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करताना प्रत्येक जिल्ह्यातील सध्याची स्थिती पाहणं गरजेचं आहे. आज अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. अशावेळी सर्वांना सोबत घेऊन समन्वयाचा तोडगा काढला पाहिजे. मात्र जायकवाडीचा मुद्दा आज राजकीय श्रेय घेण्याचा मुद्दा बनला आहे, जो बोलेल तो पुढारी चांगला, अशी स्थिती निर्माण केली जात आहे. परंतु केवळ समन्यायी पाणी वाटप कायद्याचा दरवेळी आधार घेतल्याने पाणी प्रश्न सुटण्यापेक्षा जटील होत चालला आहे, असंही विखे-पाटील म्हणाले.