मुंबई : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर भास्कर जाधव यांची नियुक्ती करावी अशी मागणी करणारे पत्र आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अध्यक्ष राहुल नार्वेकरांना देण्यात आलं. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला शरद पवारांच्या पक्षाने ठेवल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर आता स्वतः उद्धव ठाकरेंनीच स्पष्टीकरण दिलं आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच वर्षांचा कोणताही फॉर्म्युला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच संतोष देशमुख प्रकरणात एवढे फोटो, व्हिडीओ समोर आल्यानतंरही धनंजय मुंडे जर आजारामुळे राजीनामा देत आहे असं म्हणत असतील तर त्यांचा देशमुख प्रकरणात राजीनामा का घेतला गेला नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला.
विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा जवळपास सुटल्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने या पदावर दावा केला आहे. ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून तशा आशयाचं पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना देण्यात आलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, "आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेते पदासाठी भास्करराव जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे. आम्हाला खात्री आहे ही लोकशाही मूल्यांचा पालन करून लवकरात लवकर यावर निर्णय होईल. बजेटपूर्वी विरोधी पक्ष नेतेपद दिले जाईल."
मुख्यमंत्र्यांचे हात कोणी बांधले आहेत?
उद्धव ठाकरे म्हणाले की, "धनंजय मुंडे यांच्यावर जे काय बोलायचं होतं ते सगळ्या माझ्या आमदारांनी बोललं आहे. आता हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे तो की जे काही व्हिडीओ किंवा फोटो आले आहेत ते आधी सरकारकडे आले होते की नव्हते? आता फक्त धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आहे. अजून पुढे अनेक गोष्टी येतील. मुख्यमंत्री जर पारदर्शी कारभार करत असेल तर त्यांचे स्वागत आहे. पण पारदर्शीपणाने कारभार करताना त्यांचे हात कोणी बांधत आहेत का?"
मुंडेंचा राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावर की आजारीपणामुळे?
धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा नैतिकतेच्या मुद्द्यावर की आजारापणामुळे घेण्यात आला असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला. ते म्हणाले की, "धनंजय मुंडे यांनी तब्येतीचं कारण देत राजीनामा दिला आहे. तर अजित पवार म्हणतात की नैतिकतेच्या मुद्द्यावरून त्यांनी राजीनामा दिला. नैतिकतेचा मुद्दा असेल तर एवढे दिवस त्यांचा राजीनामा का घेतला नाही? मुंडेंनी तब्येतीचं कारण सांगितलं असेल आणि आता जर एवढे व्हिडीओ आणि फोटो समोर आले असतील तरीही त्या गोष्टीवरून त्यांचा राजीनामा का घेतला नाही हे स्पष्ट करावं."
महाराष्ट्र बदनाम होतंय
उद्धव ठाकरे म्हणाले की, "आधी फक्त यूपी आणि बिहारचे नाव बदनाम होतं. आता त्या दोन राज्यांसह महाराष्ट्रातही भाजपचं राज्य आहे. त्या दोन राज्यात काय सुरू आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. महाराष्ट्रात तर त्यापेक्षाही वाईट परिस्थिती आहे. या सगळ्याचा नागरिकांना आता कंटाळा आला आहे. यांच्यामुळे हे सरकार नव्हे तर महाराष्ट्र बदनाम होत आहे."
ही बातमी वाचा: