Uddhav Thackeray on Maharashtra Budget 2023  : महाविकास आघाडीची सत्ता असता असताना केंद्र सरकार आमच्या बाजूला नव्हतं.. जीएसटीची थकबाकी असायची.. आता महाशक्तीचा पाठिंबा असलेलं सरकार कसं कारभार करतेय तुम्हाला माहितेय.. आज काही शेतकऱ्यांशी बोललो अद्यापही त्यांच्या बांधावर पंचनामा करण्यासाठी अधिकारी पोहचले नाहीत. आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही घोषणा केल्या आहेत. पण शेतकऱ्यांना हमखास भाव कधी येणार, हे पाहावं लागणार आहे. आजच्या अर्थसंकल्प गरजेल तो बरसेल काय? असा आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 


अर्थसंकल्पातून मधाचं बोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गाजर हलवा अर्थसंकल्प आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. बजेटमधून जनतेच्या भावनेचा खेळ करण्यात आला आहे. आम्ही जाहीर केलेल्या योजना नामांतर करुन मांडल्या आहेत. ज्या घोषणा झाल्या त्या प्रत्यक्षात कधी येतील, हे पाहावं लागेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 



नुसत्या घोषणा करून ठेवल्या - दानवे


आम्ही जेव्हा अर्थसंकल्प मांडला होता तेव्हा जी पंचसूत्री होती तेच यांचे पंचामृत आहे. या अर्थ बजेटमध्ये काहीही नाही नुसत्या घोषणा करून ठेवल्या आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.


हे बजेट म्हणजे मृगजळ - 
 
देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले हे बजेट म्हणजे मृगजळ आहे. सध्याची स्थिती आणि बजेटमध्ये मांडलेले आकडे यावरून हे स्पष्ट दिसतंय, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केले. हे बजेट वास्तववादी दिसत नाही. महिलांना एसटीमध्ये 50 टक्के सूट देणार आणि एकीकडे एसटी महामंडळ तोट्यात असताना याचा बोजा राज्य सरकारला सहन करावा लागणार आहे. निवडणुकीआधी हे हे बजेट म्हणजे नुसत्या घोषणा आहेत वास्तव स्थिती समजून न घेता मांडलेलं हे बजेट आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले. 


फक्त घोषणांचा पाऊस - पटोले


दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस पडला आणि आता घोषणांचा पाऊस आज या अर्थसंकल्पात पाहायला मिळतोय, अशी टीका नाना पटोली यांनी केली. या अर्थसंकल्पात काही सकारात्मक नाही नुसत्या घोषणा आहेत. एसटीमध्ये महिलांना 50 टक्के प्रवास सवलत देत आहे मात्र एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तुम्ही सोडवणार कसे ?
शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत अर्थसंकल्पात मोठी तरतूद दाखवली जाते मात्र या नुसता घोषणा आहेत, असे पटोले म्हणाले. 


मविआची बैठक -
अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर थोडयाच वेळात महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमूख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी साडे पाच वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी काळातील सभा आणि अर्थसंकल्पाबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.