मुंबई : गेले काही दिवस शिवसेना-भाजपमधली दरी मिटत असल्याचं वाटत असतानाच आज उद्धव ठाकरेंनी आपल्या मॅरेथॉन मुलाखतीतून पुन्हा एकदा भाजपला टोले लगावले आहेत. देश केवळ जाहीरातबाजीवर चालणार नाही, भविष्यकाळात शिवसेनेची एकहाती सत्ता येणार आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला सूचक सल्ला दिला आहे.


 

 
बोले तैसा चाले असं वागणारा राज्यकर्ता अजूनपर्यंत देशाला लाभलेला नाही. शत-प्रतिशत वगैरे माहित नाही पण राज्यात शिवसेना स्वबळावर झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी आजच्या मुलाखतीत म्हटलं आहे. दिल्लीशी संपर्क तुटला असून भाजपशी सुसंवाद ठेवणारा कुणी नेता उरला नसल्याची कबुलीही उद्धव यांनी दिली आहे.

 
निवडणुका तर आम्ही आता लढणारच आहोत. बिहारात लढलो. उत्तर प्रदेश आणि गोव्यातही शिवसेना एका मजबुतीने उतरली आहे. देशाच्या राजकारणावर शिवसेनेच्या विचारांचा प्रभाव हा आहेच. त्याला एक राजकीय आकार देण्याचं काम सुरु असल्याचं उद्धव म्हणाले.

 

 

'पंतप्रधान मोदी जे बोलले ते योग्यच आहे. बुरहान वाणी हा अतिरेकी होता, त्याला हिरो बनवू नका. मी त्यांच्या मताशी सहमत आहे; पण त्या बुरहान वाणीसाठी जे लोक कश्मीरात रस्त्यावर उतरले आहेत, त्यांच्यापुढे आपल्या जवानांची अवहेलना करू नका. आपण केंद्रातही सत्तेवर आहात.' असा सल्लाही उद्धव यांनी दिला.

 

 

‘अब हिंदू मार नहीं खाएगा!’ ही गर्जना करणाऱ्यांचे राज्य देशात व जम्मू-कश्मीरातही आहे, पण हिंदू संकटातच आहे, या शब्दात मुलाखतीच्या पहिल्या भागात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.

 

 

पाक शिवसेनेचाच दुश्मन आहे का? उद्धव ठाकरेंचं भाजपवर टीकास्त्र