मुंबई : ‘अब हिंदू मार नहीं खाएगा!’ ही गर्जना करणाऱ्यांचे राज्य देशात व जम्मू-कश्मीरातही आहे, पण हिंदू संकटातच आहे, या शब्दात पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

 
'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रासाठी दिलेल्या मुलाखातीमध्ये उद्धव ठाकरेंनी सर्वच मुद्द्यांवरुन सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची ही मुलाखत घेतली आहे. आम्ही हिंदुत्वासाठी हल्ले सहन करायचे, संकटे अंगावर घ्यायची व इतरांनी मात्र मजा मारायची, हे किती काळ चालणार? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.

 
काश्मीर खोऱ्यात अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ले झाले. त्यात जवान, पोलीस मारले गेले. सरकार बदलल्यावर हे चित्र बदलेल अशी अपेक्षा होती. पण असं काहीच पाहायला मिळालं नाही. त्याबरोबर या देशाला ‘हिंदुराष्ट्र’ घोषित करण्याशिवाय पर्याय नाही! असंही ते म्हणाले.

 

'इथेही पाकड्यांना अंगावर घेणारी शिवसेनाच आहे. पाकिस्तानचे कलाकार आले, क्रिकेटपटू आले, कुणी पुढारी आले की आजही फक्त शिवसेनाच त्यांना विरोध करते. शिवसैनिकच अंगावरती केसेस घेतात. शिवसैनिकांनाच अटका होतात. बाकीचे काय करतात? काय गजला ऐकताहेत? का पाकड्यांचेच खेळ बघायला जातात? पाकिस्तान हा काही एकट्या शिवसेनेचाच दुश्मन नाहीय. काश्मीरमध्ये जे काही हिंदू मेलेत ते आमच्या रक्तामांसाचे आहेतच. बाकी इतर राजकीय पक्षांमधले हिंदू काय करताहेत?' अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे.