Uddhav Thackeray on Baramati Bypoll: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. आता विशेषतः काँग्रेसच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसने बारामतीमध्ये उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुहेरी कोंडीत ठाकरे यांनी सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरे-पवार कुटुंबातील जिव्हाळ्याचे संबंध
या राजकीय हालचालींमागे कौटुंबिक स्नेह असल्याचे बोलले जात आहे. सुनेत्रा पवार यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांना फोन करून चर्चा केली होती. ठाकरे आणि पवार कुटुंबाचे अनेक वर्षांपासूनचे जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेता, या संकटकाळात सुनेत्रा पवार यांना मदत करण्याचा विचार ठाकरे गटाकडून केला जात आहे. जर काँग्रेसने बारामतीमध्ये आपला उमेदवार उभा केला, तरी शिवसेना (UBT) काँग्रेसला पाठिंबा न देता सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभी राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. खुद्द उद्धव ठाकरे उद्या (5 एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन यावर अधिकृत भाष्य करण्याची शक्यता आहे.
राहुरी पोटनिवडणुकीत वेगळी रणनीती?
एकीकडे बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याची चर्चा असताना, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत मात्र शिवसेनेची भूमिका वेगळी आहे. राहुरीमध्ये उमेदवार देण्याबाबत किंवा कोणाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष एकत्र बसून घेणार आहेत. बारामतीत 'कौटुंबिक संबंध' प्राधान्यावर असले, तरी राहुरीत मात्र 'राजकीय आघाडी' म्हणून निर्णय घेतला जाईल, असे चित्र आहे.
अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेली जागा
अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी एका विमान अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बारामतीवर शोककळा पसरली असून, त्यांच्या वारसदार म्हणून आता सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. अजितदादांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी ही निवडणूक त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
पोटनिवडणूक कार्यक्रम
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार बारामती आणि राहुरीसह राज्यातील रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान 23 एप्रिल रोजी असून मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 6 एप्रिल आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
