मुंबई : राज्यात सध्या भोंदू बाबा अशोक खरातप्रकरणावरुन (Ashok kharat) राजकीय आरोप प्रत्यारोपही पाहायला मिळत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरातचे सीडीआर समोर आणले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेतही त्यांचा अनेक कॉल झाल्याची माहिती दमानिया यांनी दिली. त्यासंदर्भाने शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Ruat) यांनी प्रतिक्रिया देताना, अंजली दमानिया (Anjali damania) यांच्यावरच सवाल उपस्थित केला आहे. अंजली दमानिया काय रॉ एजंट आहेत का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. तसेच, सरकारच्या निशाण्यावर स्वकीयच आहेत, असे म्हणत नाव न घेता एकनाथ शिंदेंनाही लक्ष्य केलं. 

अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही सीडीआर समोर आणले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रुपाली चाकणकर आणि काही नेत्यांच्या खरातसोबत झालेल्या संवादाचे डिटेल्स त्यांनी दिले आहेत. त्यावर, संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. अंजली दमानिया काय रॉ एजंट आहेत का? मुख्यमंत्री कार्यालयशिवाय एवढी गुप्त माहिती बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे फडणवीस यांच्या टार्गेटवर कोणीतरी आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. बाह्य शक्तीकडून जेंव्हा धक्कादायक माहिती बाहेर काढली जाते, तेंव्हा स्वकीय सरकारच्या निशाण्यावर आहे, असेही राऊत यांनी म्हटले. 

उद्धव ठाकरेंना फोन आला, पण.. (Uddhav Thackeray calling)

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नक्कीच काल उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. बारामती पोटनिवडणुकी संदर्भात चर्चा केली. मात्र, काय चर्चा केली आणि काय निर्णय घेणार यावर उद्धव ठाकरे स्वत: पत्रकार परिषद घेतील, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. काँग्रेसशी मी चर्चा केली, त्यांच्याकडे सुद्धा 4-5 उमेदवार इच्छुक आहेत, आत्ता उद्धव ठाकरे हेच यावर निर्णय घेतील. महाविकास आघाडी म्हणून निर्णय घ्यायचा असेल तर एक पक्ष निर्णय घेऊन शकत नाही. काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेल आणि मगच आम्ही निर्णय घेऊ, असेही राऊत यांनी म्हटलं. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांचे सहकारी आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी काम केलं आहे. उद्धव ठाकरेंचे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते, त्यांच्या परिवारांशीही तसेच संबंध आहेत. त्यामुळे, या सगळ्यावर चर्चा करुन उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. 

खासदारांनी जेवणास जाणे सर्वसाधारण बाब - राऊत (Sanjay Raut)

दिल्लीमध्ये डिनर डिप्लोमसी होत असते, खासदार, मंत्री असं जेवण ठेवत असतात, त्याला अनेकजण जात असतात. आम्ही सुद्धा अनेक ठिकाणी जातो, अनेक घडामोडी घडत असतात. ऑपरेशन टायगर म्हणणं किंवा त्याला डिनर डिप्लोमसी म्हणणं चुकीचं आहे, असे म्हणत खासदार नागेश आष्टीकर यांच्या भेटीच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच, उद्धव ठाकरे जेंव्हा दिल्लीला येणार होते तेंव्हा त्यांच्या स्वागतला आम्ही सुद्धा जेवण ठेवणार होतो. आम्ही महाविकास आघाडीच्या खासदारांसाठी जेवण ठेवणार होतो. आता, मंत्री म्हटल्यानंतर तो देशाचा मंत्री असतो, त्यामुळे त्यांच्याकडून सगळ्याला जेवण्याचं निमंत्रण असतं, असे स्पष्टीकरणही राऊत यांनी दिले.

हेही वाचा

काँग्रेसच्या भूमिकेमुळे ठाकरेंची शिवसेना कात्रीत! बारामती-राहुरी पोटनिवडणुकीत 'मविआ'चा धर्म की राष्ट्रवादीला साथ?