Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुलाखतीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची सडकून टीका केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीटवरुन उद्धव ठाकरेंवर काय निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंना अल्झायमरचा आजार झाला असावा, असं म्हणत बावनकुळेंनी थेट ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे. पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेवरही बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोदींनी काय केलं हे विचारण्यापेक्षा 2019 साली केलेली भाषणं आठवा, असं बावळकुळेंनी म्हटलं आहे. तसेच, मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडणार नाही पण तुमच्या भ्रष्ट कारभारातून मुक्त करू, असं म्हणत बावनकुळेंनी ठाकरेंना टोलाही लगावला आहे. 






चंद्रशेखर बावनकुळेंनी ट्वीट करुन उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे. ते म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवलं. अडीच वर्षांत अडीच दिवसही ज्यांना मंत्रालयात जावं वाटलं नाही ते उद्धव ठाकरे मोदीजींनी नऊ वर्षांत काय केलं? असा प्रश्न विचारत आहेत. बहुधा तुम्हाला अल्झायमरचा आजार झाला आहे. कारण 2019 च्या निवडणुकीत मोदीजींच्या कर्तृत्वावर तुम्ही शेकडो भाषणं केली आणि जिंकून आलात. जरा चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या. म्हणजे मोदीजींवर केलेली भाषणं तुम्हाला आठवतील."


"महायुतीच्या जागा वाटपाची चिंता तुम्ही करू नका, तुमची शिल्लक सेना तरी निवडणुकीपर्यंत तुमच्यासोबत राहते का? त्याकडे लक्ष द्या. आत्मनिर्भर भारतासाठी महायुती झाली आहे. तर तुमची महाविकास आघाडी सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी झाली. तुमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी 5 दावेदार बाशिंग बांधून बसले आहेत. त्यात तुम्हीही बोहल्यावर बसण्यासाठी उत्सुक आहात. पण 2024 साली जनता तुम्हाला तुमच्या आवडीचं घरी बसण्याचं काम देणार आहे.", असंही बावनकुळे म्हणाले. 


"30 वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता मिळवून मुंबईची ज्यांनी लूट केली आणि मुंबईतील मराठी माणसाला विकासापासून दूर ठेवलं. ते उद्धव ठाकरे आज मुंबईची चिंता करत आहेत. मुंबईवरील तुमचं बेगडी प्रेम ऊतू जात आहे. मुंबई तोडणार असं सांगून तुम्ही मुंबईकरांची दिशाभूल करत आहात. मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडणार नाही पण येत्या निवडणुकीत तुमच्या भ्रष्ट कारभारातून मात्र मुंबई नक्की मुक्त होईल.", असं म्हणत त्यांनी ठाकरेंना टोलाही लगावला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Uddhav Thackeray Interview : पक्ष नाही, नाव, चिन्ह चोरलं तरीही माझी भीती वाटते?, उद्धव ठाकरेंचा सवाल; अख्खा भाजप आपल्याविरुद्ध असल्याचाही दावा