Uddhav Thackeray Interview : राज्यातील सत्ता संघर्ष अद्याप सुरुच आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आणि राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. तत्काली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि राज्यात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे गटानं भाजपसोबत एकत्र येत राज्यात नवं सरकार स्थापन केलं. शिंदे गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. दोन्हीकडून सातत्यानं आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अद्यापही जडताना दिसत आहेत. आता शिंदे गटाकडून आमचीच खरी शिवसेना असा दावा केला जात आहे. एवढंच नाहीतर या बंडखोर आमदारांकडून शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरही दावा केला जात आहे. राज्याच्या राजकारणात दिवसागणिक नाट्यमय घडामोडी घडत असताना सध्या चर्चा रंगली आहे ती, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीची. 


शिंदेंच्या बंडानंतर आज उद्धव ठाकरेंची सामनातील मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित केला जाणार आहे. शिवसेनेतील बंडानंतर आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंची ही पहिली मुलाखत. या खळबळजनक मुलाखतीतून अनेक अनुत्तरीत  प्रश्नांची सडेतोड उत्तरं या मुलाखतीतून मिळू शकतात. तसेच, या मुलाखतीतून बंडाच्या वेळी पडद्यामागचे अनेक खुलासे देखील होऊ शकतात. आज सकाळी 8.30 वाजता एबीपी 'माझा'वर मुलाखतीचं प्रक्षेपण केलं जाणार आहे.


 


शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही मुलाखत घेतली आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बंड करुन महिना उलटला त्यानंतर आता उद्धव ठाकरेंची मुलाखत संजय राऊतांनी घेतली आहे. 26 आणि 27 जुलैला म्हणजेच, आज आणि उद्या ही मुलाखत प्रदर्शित होणार असून सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तरं मिळतील असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे. 


मुलाखतीपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊतांनी ट्वीट करत मुलाखतीचे दोन टीझर ट्विटरमार्फत शेअर केले होते. टीझरमध्ये उद्धव ठाकरे बंडखोरांवर घणाघाती टीका करताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी शेअर केलेल्या टिझरमध्ये सूड, हल्लाबोल आणि गौप्यस्फोट असे शब्द ऐकायला मिळत आहेत. शिवसेनेच्या बंडाळीनंतर सामनामधील उद्धव ठाकरेंची पहिलीच मुलाखत असल्यामुळे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 



बहुप्रतिक्षित मुलाखतीमध्ये संजय राऊत उद्धव ठाकरेंना शिवसेनेतील बंड, मुख्यमंत्री पद, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा, बंडखोरांकडून सातत्यानं करण्यात येणारे आरोप-प्रत्यारोप यांसारख्या विषयांवर थेट प्रश्न विचारले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना खिंडार तर पडलंच, पण सोबतच मोठा राजकीय भूकंप झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेत बंड केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंवर अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यासर्व घडामोडींमध्ये बंड, सत्तांतर नाट्य, शिवसेनेतील अंतर्गत कलह यांबाबतचे अनेक प्रश्न अनुत्तरित होते. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं उद्धव ठाकरे देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 


विश्वासदर्शक ठराव, मुंबईचा घात? मुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी होती? फुटीरांचे आक्षेप, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांच्या थेट प्रश्नांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात होत आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर उद्धव ठाकरे मुलाखतीतून कोणते बाण सोडणार आणि काय गौप्यस्फोट होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.