मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
उद्धव ठाकरेंची मुलाखत प्रसारित होणार..हल्लाबोल..आसूड..गौप्यस्फोट?
संजय राऊतांनी घेतलेल्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला भाग आज सामनाकडून प्रसारित होणार आहे. ही मुलाखत 8.30 वाजता प्रसारित होणार आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतरची ही उद्धव ठाकरेंची पहिलीच मुलाखत आहे.
आरे मेट्रो कारशेड परिसरात कामाला सुरुवात
मेट्रोच्या बोगी आरे कारशेडमध्ये नेण्यासाठी रस्ते बंद करून वृक्षांच्या फांद्या छाटणीस सुरुवात करण्यात आली आहे. पर्यावरणवाद्यांनी झाडांच्या छाटणीस विरोध केलाय. यामुळे काही पर्यावरणवाद्यांना नोटीस पाठवण्यात आल्या असून काही जणांना ताब्यात घेण्यात आलंय. यामुळे पर्यावरणवादी अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
आज दुसऱ्यांदा सोनिया गांधींची ईडी चौकशी
नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज सोनिया गांधींना दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. चौकशीची वेळ निश्चित नाही. याविरोधात काँग्रेसकडून देशभर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. दिल्लीत संसदेच्या बाहेर आणि आतमध्ये आंदोलन करण्यात येईल. मुंबईत मंत्रालयाजवळच्या गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे . पुणे, वाशिममध्येही आंदोलन होणार आहे.
मलिकांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. ईडीनं मलिकांच्या जामीनास जोरदार विरोध केला आहे. नवाब मलिक हे सध्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे रूग्णालयात उपचार घेत आहेत.
पावसानं अनेक रेकॉर्ड मोडले
आतापर्यंत झालेल्या एकूण पावसानुसार राज्यात 38 टक्के अतिरिक्त पाऊस पडलाय. नाशिकचा जुलै महिन्यातील पर्जन्याने 81 वर्षांचा रेकॉर्ड मोडीत काढलाय. यावर्षी जुलै महिन्याच्या 25 दिवसातच 550 मिमी पाऊस झालाय.
केतकी चितळेच्या याचिकेवर सुनावणी
शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट करणा-या केतकी चितळेनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. केतकीनं तिच्याविरोधात राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे
व्यापाऱ्यांचे आजपासून देशव्यापी आंदोलन
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं (CAIT) जीएसटी कायदे सुलभ करण्याच्या मागणीसाठी आजपासून देशव्यापी आंदोलन सुरु करणार. भोपाळमधून व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात होईल. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांवर अनावश्यक कर आकारणीचा बोजा आणि क्लिष्ट कर आकारणीच्या नियमांमुळे व्यापाऱ्यांची अडचण होत असल्याचं सीएआयटीकडून स्पष्ट करण्यात आलंय. नुकत्याच फुटवेअर, कापड आणि अनब्रॅंडेड फूड प्रोडक्टवरील जीएसटी कर मागे घेण्याचीही मागणी करण्यात आलीय