Uddhav Thackeray In Marathwada: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (5 नोव्हेंबर) मराठवाड्यातील दौऱ्यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारला आणि शेतकऱ्यांना एकजुटीचे आवाहन केले. “आडल्यानडल्या शेतकऱ्याला आता जर या संकटाच्या खाईतून बाहेर काढले नाही, तर तो पुन्हा उभा राहणार नाही,” असा इशारा देत उद्धव ठाकरेंनी सरकारवर थेट हल्लाबोल केला. ठाकरेंनी ठामपणे सांगितले की, “शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. जोपर्यंत शेतकरी म्हणून एकवटत नाही, तोपर्यंत कुणीही न्याय देणार नाही. शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवून द्यावी, जर मातीला कोंब फोडता, तर सरकारच्याही अन्यायाविरोधात पाझर फोडू शकत नाही का?” अशी विचारणा त्यांनी केली. ते पुढे म्हणाले, “जेव्हा आंदोलनासाठी हाक दिली जाईल, तेव्हा प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरा. हाच न्याय मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे.”
मदत पॅकेज आणि पीक विम्यावर हल्लाबोल (Uddhav Thackeray on Farmer Help)
“सरकारने जाहीर केलेलं पॅकेज अर्धवट आहे, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे,” असे उद्धव ठाकरेंनी संतप्तपणे म्हटले. “पीक विम्याचे पैसे मिळायला लागलेत, पण अकोल्यात 2 रुपये, 30 रुपये, तर पालघर आणि ठाण्यात 2 रुपये 30 पैसे इतकी रक्कम मिळतेय, ही थट्टा असल्याचे ते म्हणाले. “ज्याची जमीन खरडून गेली, तो शेतकरी कर्जापेक्षा आधी माती मागतोय. जर जूनमध्ये कर्जमाफी करणार असाल, तर आताचे हप्ते शेतकऱ्यांनी फेडायचे की नाही, हे स्पष्ट सांगावं,” अशी मागणी ठाकरेंनी केली. “दिवाळीच्या आत मदत मिळणार म्हणाले होते, पण दिवाळी गेली, तुळशीचं लग्नही झालं, तरी सरकार फक्त पंचांग आणि मुहूर्त बघतंय, मदत मात्र ठणठणाट!” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. कर्जमुक्तीबाबत ठाकरे यांनी सरकारच्या अभ्यास धोरणावर चांगलेच खडे बोल सुनावले. “कसला अभ्यास करता? मी मुख्यमंत्री असताना महात्मा फुले यांच्या नावाने शेतकरी कर्जमुक्त योजना राबवली होती. तेव्हा कोणतीही समिती नव्हती, ती आमची जबाबदारी होती,” असं ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांवर थेट टीका (Uddhav Thackeray on Devendra Fadnavis
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “आज मी मराठवाड्यात फिरत आहे आणि मुख्यमंत्री कुठे आहेत? ते बिहारला आहेत,” असा प्रश्न त्यांनी केला. “मुख्यमंत्री तिकडे सांगतात की पंतप्रधानांना सगळ्या राज्यांवर प्रेम आहे, पण सगळ्यात जास्त प्रेम बिहारवर आहे. अशा पक्षाच्या हातात आपण आपला महाराष्ट्र दिला आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे,” अशी खोचक टीका त्यांनी केली.
जूनच्या मुदती’वर आणि केंद्रीय पथकावरही निशाणा (Uddhav Thackeray on Loan Waiver)
उद्धव ठाकरेंनी सरकारच्या ‘जूनच्या मुदती’वर आणि केंद्रीय पथकावरही निशाणा साधला. “जूनपर्यंतची मुदत ही केवळ नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी वेळकाढूपणा आहे. केंद्रीय पथक रात्री टॉर्च मारून पाहणी करतंय, अहवाल देईल, आणि निवडणुकांच्या वेळी पंतप्रधान मोठं पॅकेज जाहीर करून कोपऱ्याला गूळ लावतील,” असा आरोप त्यांनी केला. “या सरकारमध्ये खोटं बोलणं आणि मत चोरी चालली आहे. खोट्या थापा मारून मतं चोरली जातायत, याद्यांमध्ये फेरफार करून मतांची चोरी केली जात आहे,” असा आरोप ठाकरे यांनी केला. अजित पवारांच्या विधानावरही त्यांनी जोरदार प्रहार केला. “अजित पवार बेधडक सांगतात, ‘आम्हाला जिंकायचं होतं म्हणून कर्जमाफी बोललो.’ हा अन्नदात्याचा अपमान आहे,” असं ठाकरे म्हणाले. “आमदारकीच्या निवडणुकीत आमचा पराभव बाहेरून 20,000 मतदार आणून केला गेला,” असे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या