Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटात (Thackeray Group) कार्यकारिणीचा विस्तार झाल्यानंतर काही नेते, पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे. नाराज असलेले नेते, पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात (Shinde Group) जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकारणीचा विस्तार होऊन आणि पदं देऊनसुद्धा ठाकरे गटाला खिंडार पडणं थांबणार नसल्याचं दिसतंय. नेमकं काय आहे नाराजीचं कारण? आणि असे कोणते नेते पदाधिकारी शिंदेंसोबत जाण्याच्या तयारीत आहेत?
पक्षात पडलेल्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटानं आपल्या कार्यकारणीचा मोठा विस्तार केला. एकूण सहा आमदार, खासदारांना नेते पद दिलं. तर उपनेते आणि संघटक पदीसुद्धा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही नव्या आणि युवा सेनेतील काही युवा चेहऱ्यांना याच कार्यकारणीच्या विस्तारात पद देऊन मोठी जबाबदारी देण्यात आली. आता याच कार्यकारणीच्या विस्तारानंतर नव्या जबाबदारीसह नेत्यांसोबत पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या जोमानं कामाला लागतील, असं जरी वाटत असलं तरी प्रत्यक्षात याच कार्यकारणीच्या विस्तारामुळे काही जणांच्या नाराजीची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या काही महिला संघटक, सोशल मीडिया टीम, युवा सेना पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये अपेक्षित पदाची जबाबदारी न दिल्यानं आणि काही जणांनी पक्षात इतके वर्ष काम करूनसुद्धा नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यानं मनात खदखद असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे काहीजण शिंदे गटाच्या संपर्कात असून ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत, तर काहीजण पक्षात असून बघ्याच्या भूमिकेत आहेत.
आतापर्यंत मुंबईतील ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात पस्तीसहुन अधिक माजी नगरसेवक सामील झाले आहेत आणि या नाराजीनंतर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारण शिंदे गटात ठाकरे गटातील नेत्यांना मोठं पद आणि त्या प्रकारची जबाबदारी देण्याचं आश्वासन दिलं जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर काही पदाधिकाऱ्यांनी पक्षात होत असलेल्या घडामोडीमुळे थेट आपली नाराजी आदित्य ठाकरे यांना बोलून दाखवल्याचं म्हटलं आहे.
त्यामुळे ठाकरे गटाला वारंवार पडणारा खिंडार आणि शिवसेना शिंदे गटात होणारे प्रवेश हे थांबवण्याचा मोठा आव्हान सध्याच्या घडीला समोर आहे. त्यात ठाकरे गटाला पक्ष मजबूत करण्यासोबत नाराज नेत्यांची पदाधिकाऱ्यांची समजूत सुद्धा काढावी लागणार आहे. त्यामुळे या दुहेरी आव्हानांना ठाकरे गट कसा सामोरे जातो हे पाहावं लागेल.