'नवसाचं पोर उडाणटप्पूचं निघतं', उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका
एबीपी माझा वेब टीम | 25 Nov 2017 04:05 PM (IST)
‘हे सरकार म्हणजे नवसाचं पोर आहे. त्यामुळे नवसाचं पोर जर उडाणटप्पू निघालं तर बोलायचं कुणाला?’ अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.
कोल्हापूर : ‘हे सरकार म्हणजे नवसाचं पोर आहे. त्यामुळे नवसाचं पोर जर उडाणटप्पू निघालं तर बोलायचं कुणाला?’ अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. ‘सरकारच्या धोरणामुळे जेरीस आलेल्या उद्योजकांनी आंदोलन छेडल्यास मी स्वतः त्याचं नेतृत्व करेल.’ असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलं. आज (शनिवार) कोल्हापूर दौऱ्यावेळी त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला. सरकारनं शेतकरी, उद्योजक आणि व्यापाऱ्यांना देशोधडीला लावलेलं असलं तरी रामदेवबाबांसारखे नवे उद्योजकही पुढे येत आहेत. अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान, याचवेळी उद्धव ठाकरेंनी सरकारच्या जाहिरातबाजीवरही हल्लाबोल केला. ‘मी खूप काही तरी करतोय असा आभास निर्माण करायचा आणि त्यावर जाहिराती करुन भोळ्याभाबड्या जनतेला फसवायचं आणि पुढे आपलं चालू ठेवायचं ही सरकारची व्याख्या माझी नाही. ही लोकशाही मानायला मी तयार नाही.’ असंही ते यावेळी म्हणाले.