कोल्हापूर : शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही. गरज पडली तर सत्तेला लाथ मारेन आणि जनतेसोबत येईन, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. शिनोळीत शिवपुतळ्याचे अनावरण केल्यानंतर शेतकरी मेळाव्यात ते सहभागी झाले. त्यावेळी उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला.


विशेष म्हणजे मेळाव्यातील शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरुन खाली उतरुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या समस्या, सीमाप्रश्न यावर भाष्य केले.

“कीटकनाशक फवारणारा शेतकरीच कीटकनाशकांचा बळी ठरतो आहे. कर्जमुक्ती फक्त कागदावरच आहे. शेतकऱ्याची फसवणूक होऊ देणार नाही. गरज पडली तर सत्तेला लाथ मारुन तुमच्यासोबत येईन.” असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलं.

सीमाभाग म्हणजे मराठी भूभाग आहे. देशाच्या सीमांना सीमा म्हणतात. म्हणून मी सीमाभाग म्हणजे कर्नाटव्याप्त महाराष्ट्र असे म्हणतो. कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र मी माझ्या महाराष्ट्रात आणेन, असे वचन देतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस बंद दरवाजाआड चर्चा करतात आणि चर्चा कशाबद्दल झाली, विचारल्यावर क्रिकेटची चर्चा म्हणून सांगतात. मेलं ते क्रिकेट. शेतकऱ्याचं काय होणार याचा विचार करा.” असे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या भेटीसंदर्भात म्हटले.