मुंबई : शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात पार पडला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातले अनेक मुद्दे आणि मेळाव्याला जमलेली गर्दी याची चर्चा सर्वत्र आहे. दसरा मेळाव्याचा ट्रेलर म्हणून सगळे या गर्दीबाबत चर्चा करत आहेत. पण या मेळाव्यात अजून एक विषय म्हणजेच एक व्यक्ती चर्चेत आहे. ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या अवतीभोवती हातात फाईल घेतलेले रवी म्हात्रे बऱ्याच वर्षांनी दिसले.
शिवसेनेतील शिंदे यांच्या बंडानंतर संजय राऊत यांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरे यांचे सल्लागार तथा सहाय्यक बदलले असल्याची चर्चा सुरू आहे. मुळात फोटोत दिसणारे हे रवी म्हात्रे नक्की कोण आहेत आणि अचानक त्यांच्या उपस्थितिची चर्चा का होतेय,या संदर्भात जाणून घेऊया
शिंदे गटाच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंचे सल्लागार बदलले?
शिवसेनेतील 40 आमदार सोबत घेऊन बंड केलेल्या शिंदेंमुळे उद्धव ठाकरे यांच्या गोटात अनेक बदल होत आहेत. शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या अनेकांनी आपल्या बंडामागे उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांवरदेखील आरोप केले. त्यामध्ये त्यांचे खाजगी सहाय्यक असलेले मिलिंद नार्वेकर यांच्यावरही तो रोख दिसला. म्हणूनच की काय आता मिलिंद नार्वेकर यांच्या ऐवजी रवी म्हात्रे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जास्त प्रमाणात दिसतायत.
पण हे रवी म्हात्रे नक्की कोण आहेत ?
रवी म्हात्रे हे 2004 पासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहाय्यक होते. पूर्वी मातोश्रीवर बाळासाहेबांकडून येणारे निरोप हे रवी म्हात्रेंकडूनच यायचे. बाळासाहेबांसाठी फोन केला तर तो फोन रवी म्हात्रेच उचलायचे. आमदार, खासदारच नव्हे तर साध्या शाखाप्रमुखांची व्यथा, तक्रार ते साहेबांपर्यंत पोहोचवायचे. तसेच बाळासाहेबांच्या कार्यक्रमांचे नियोजनही करायचे. तेच बाळासाहेबांना रोज पेपर वाचून दाखवायचे, त्यातील महत्त्वाच्या बाबी काढायचे आणि संबंधित लोकांना बोलावून संवाद घडवायचे. मातोश्रीवर आधी 'राजे' होते...साहेबांचे सर्वात विश्वासू मदतनीस, खास सहकारी...'राजे' अचानक मातोश्री सोडून गेले आणि रवी म्हात्रेंचं 'महत्त्व' वाढलं. पण म्हात्रे कधी 'किटली गरम' श्रेणीत गेले नाहीत. ते सामान्य शिव सैनिकांना मित्रासारखी वागणूक द्यायचे, असे राजकीय जाणकार सांगतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर रवी म्हात्रे हे मातोश्रीवरचं उद्धव ठाकरेंसह कुटुंबाच सगळं नियोजन पाहत होते. मात्र सत्ता संघर्षात शिंदे गटाच्या बंडानंतर आता उद्धव ठाकरे यांचे सहाय्यक म्हणून मागेपुढे करताना रवी मात्रे प्रामुख्याने दिसतात.
आता प्रश्न राहतो की मग मिलिंद नार्वेकर आहेत कुठे?
उद्धव ठाकरेंचे खाजगी स्वीय सहाय्यक असलेले मिलिंद नार्वेकर हे आता पक्षाचे सचिव पद सांभाळत पक्षाचे काम करत आहेत, अशी माहिती मिळत आहे. 54 वर्षीय मिलिंद नार्वेकर हे पूर्वी उद्धव ठाकरे यांचे खासगी स्वीय सहाय्यक होते. त्यांना सन 2018 मध्ये शिवसेनेचं सचिव म्हणून घोषीत करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे सन 1994 पासून मिलिंद नार्वेकर हे ठाकरेंशी संपर्क साधू इच्छिणाऱ्या शिवसैनिकांमधील प्रमुख दुवा ते होते.तसेच तिरुपती ट्रस्टच्या सदस्य पदी देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचबरोबर ठाकरेंच्या विविध राजकीय यात्रांचं आणि अनेक राजकीय रणनीतीचं नियोजनही त्यांनी केलं आहे.
राज्यात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या राजकीय भूकंपानंतर सुरतला नेमकं काय घडतंय, शिंदे गट पुन्हा येऊ शकतो का याची चाचपणी करायला सर्वात आधी शिवसेनेकडून कुणाला पाठवलं गेलं असेल तर ते नाव होतं, मिलिंद नार्वेकर. वास्तविकतेत नार्वेकर हे कार्यकर्ते व नेत्यांचे मेसेज मातोश्रीपर्यंत पोहचू देत नाहीत आणि निवडणुकीत तिकीट वाटपात पैसे घेतात असा आरोप त्यांच्यावर झाला. महत्त्वाचे म्हणजे शिंदे गटातील बंड पुकारलेल्या नेत्यांनि नार्वेकरांबद्दलची आपली नाराजी बोलूनही दाखवली होती. त्यामुळे सध्या उद्धव ठाकरे यांच्या सहाय्यकाची जबाबदारी थोडी कमी करून ते पक्षाच्या कामात सक्रिय असल्याची माहिती मिळतेय. याच काळात कारणामुळे बाळासाहेबांची काम करणारे रवी म्हात्रे आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत सतत पाहायला मिळत आहेत.
शिंदेंसह भाजप नेते आणि नार्वेकरांच्या भेटीमुळे तर्क-वितर्क...
गणेशोत्सवादरम्यान उद्धव ठाकरे यांचे सचिव असलेले मिलिंद नार्वेकर यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली होती. ही भेट बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी होती असं सांगण्यात आलं होतं. माञ या भेटीने राजकीय वर्तुळातल्या चर्चा आणखी जोर धरू लागल्या. या शिंदे-नार्वेकर भेटीत राजकीय चर्चा झाली असेल हे तर नक्की होतं. यानंतरही पक्षांतर्गत अनेक घडामोडी घडल्या ज्यामुळे नार्वेकरांना आता खाजगी सचिव पदावरून बाजूला केले जाईल अशी देखील चर्चा होती.
नव्या बदलांची, नव्या धोरणाची नांदी तर नव्हे?
शिंदे गटाच्या बंडानंतर संजय राऊत यांना झालेली अटक, तेजस ठाकरेंची राजकारण एन्ट्री होण्याबाबतच्या चर्चा, दसरा मेळावा शिवाजी पार्कवर कोण घेणार, धनुष्यबाण राहणार की जाणार या सगळ्या गोंधळात ठाकरे गटाला आता नवी धोरणे अवलंबणे आवश्यक आहे असं राजकीय विश्लेषक म्हणतात. आणि अशातच शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यातील मंचावर उद्धव ठाकरेंच्या मागे हातात फाईल्स घेतलेले रवी म्हात्रे दिसले. ही बाब म्हणजे नव्या धोरणांची, बदलांची नांदी तर नव्हे अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. सल्लागार किंवा सहाय्यक बदलले की विचारदेखील बदलतात ही गोष्ट महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नवी नाही.