Chhatrapati Sambhaji Nagar Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha : छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची वज्रमूठ सभा सुरु असताना आज काही वेगळ्या आणि लक्षात घेण्यासारख्या गोष्टी मंचावर दिसत होत्या. सगळ्या खुर्चा एक प्रकारच्या असताना त्यातील एक खुर्ची ही विशेष आणि सर्वांचं लक्ष खेचून घेणारी होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील मंचावर असताना ती खुर्ची मधोमध आणि मोकळी दिसत होती. या सभेसाठी सर्वात शेवटी एन्ट्री झाली ती उद्धव ठाकरे यांची आणि एकच जल्लोष सुरू झाला, फटाक्यांची आतषबाजीही झाली. नंतर त्या विशेष खुर्चीवर उद्धव ठाकरे आसनस्थ झाले. या सर्व प्रसंगावरुन राज्यातील महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंना प्रमुख नेता म्हणून अधोरिखीत केल्याचं चित्र आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मविआने अधिक अधोरेखित केल्याचं चित्र पाहायला मिळालं. आजच्या या सभेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील असे दिग्गज नेते मंचावर उपस्थित होते. त्यावेळी मविआ सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नेता म्हणून प्रत्येकाने त्यांचा भाषणात आदरपूर्वक उल्लेख केला.
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या कामाचं त्यांच्यापेक्षा अनुभवी असलेल्या मंचावरच्या सर्वच नेत्यांनी कौतुक केलं. इतकंच नव्हे तर त्यांच्यासाठी सर्व नेत्यांपेक्षा वेगळी खुर्ची ठेवण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांची मंचावर सर्वात शेवटी एन्ट्री झाली, तेव्हा आसमंतात फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. एकूणच आजच्या सभेने उद्धव ठाकरेंनाच मविआचा प्रमुख नेता म्हणून प्रोजेक्ट केलं का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली.
पोलिसांची चोख व्यवस्था अन् सभा सुरळीत
छत्रपती संभाजीनगरचं राजकीय वातावरण आजच्या रविवारी घुसळून निघालं. निमित्त होतं ते महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेचं आणि भाजप-शिवसेनेच्या सावरकर गौरव यात्रेचं. महाराष्ट्राच्या राजकारणातील जवळपास सर्वच प्रमुख नेते इथे उपस्थित होते, त्याचवेळी प्रमुख पक्षांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने हजर होते. तसंच गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी झालेल्या घटनांची पार्श्वभूमीही आजच्या दिवसाला होती. साहजिकच पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण होता. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली तमाम पोलीस दल, अन्य सुरक्षा यंत्रणांनी आपली जबाबदारी अत्यंत चोख पार पाडली. त्यांच्या चोख सुरक्षा व्यवस्थेमुळे सभा आणि यात्रा निर्विघ्नपणे सुरळीत पार पडल्या. त्यांच्या या योगदानानिमित्ताने पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेला आज आपल्याला सलाम करायलाच हवा.
ही बातमी वाचा: