Maharashtra Political Crisis: पुढच्या काही तासांतच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लागू शकतो. सत्तासंघर्षाच्या निकालासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असून अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच सत्तासंघर्षाच्या निकालाबाबतच्या घटनातज्ञ उल्हास बापट यांच्या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असं वक्तव्य घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी केलं आहे. तसेच, दहाव्या सुचीनुसार 16 आमदार अपात्र व्हायलाच हवेत, असंही उल्हास बापट यांनी म्हटलं आहे. 


सर्वोच्च न्यायालयानं जर स्टेटस को अँटे, अर्थात आधीची परिस्थिती पुन्हा आणण्याचा निर्णय दिला, तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंंत्री होऊ शकतात, असं मत ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलं आहे. दहाव्या सुचीनुसार 16 आमदार अपात्र ठरले पाहिजेत, आणि तसं झालं तर उर्वरित 24 आमदारही अपात्र ठरतील, असा दावाही बापट यांनी केला आहे.


सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. यासंदर्भात एबीपी माझानं ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी उल्हास बापट यांनी केलेल्या वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ते म्हणाले की, "अॅन्टी डिफेक्शन लॉ राजकीय भ्रष्टाचार कमी व्हावा, लोकांनी पक्षांतर करु नये, यासाठीच आणला गेला. यातील पहिली तरतूद म्हणजे, एक तृतियांश लोक पक्षातून बाहेर पडले तरी अपात्र होत नव्हते, ही तरतूद काढून टाकण्यात आली आहे. या कायद्यात घटनादुरुस्ती करुन दोन तृतियांश जण पक्षातून एकाच वेळी बाहेर पडले आणि ते दुसऱ्या पक्षात जाऊन सामिल झाले, तर ते अपात्रतेपासून वाचतील, अशी तरतूद आहे. पण याप्रकरणात बाहेर पडलेले 16 जण दोन तृतियांशही होत नाहीत, तसेच ते कोणत्याही पक्षात सामील झालेले नाही. हाच मुद्दा कपिल सिब्बल यांनी पहिल्याच सुनावणीवेळी मांडला होता." 


...तर शिंदेंना मुख्यमंत्री पदावर राहता येणार नाही : उल्हास बापट 


"घटनादुरुस्तीनंतर अॅन्टी डिफेक्शन लॉ अंतर्गत जर अपात्र ठरले, तर त्यांना मंत्रीपदावर राहता येत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर राहता येणार नाही. मुख्यमंत्री गेले की, सरकार पडतं. आता महाराष्ट्रात सरकार कोसळलं तर इतर कोणाकडेच बहुमत नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल. राष्ट्रपती राजवट आली तर सहा महिन्यांच्या आतच राज्यात निवडणुका घ्याव्या लागतील.", असं उल्हास बापट म्हणाले. 


पाहा व्हिडीओ : Ulhas Bapat On Maha Political Crisis: शिंदे राजीनामा देऊन उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात



...तर मात्र सध्याचं सरकार वाचेल : उल्हास बापट


एकनाथ शिंदे पायउतार होण्याच्या चर्चांवरही उल्हास बापट यांनी वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, "एकनाथ शिंदेंनी राजीनामा दिली आणि त्यांच्याजागी असा मुख्यमंत्री नेमला जो अपात्र ठरु शकत नाही, तर मात्र हे सरकार वाचेल. 16 आमदार अपात्र ठरतील, पण सरकार वाचेल आणि सरकारचा कारभार सुरळीत सुरू राहील. मंत्री गेला तर सरकार पडत नाही, मुख्यमंत्री गेला तर सरकार पडतं. ही एक खेळी असू शकते. परंतु, पुन्हा एक अडचण येणारच आहे की, 16 आमदार अपात्र ठरले तर उरलेले आमदारही अपात्र ठरणार म्हणजेच, 40 आमदार अपात्र ठरणार."


"त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं 16 आमदार अपात्र असल्याचा निकाल दिला, तर उरलेले आमदार पुन्हा ठाकरेंकडे येऊ शकतात. अनेक शक्यता आहेत. हा राजकारणातील खेळी झाली.", असंही उल्हास बापट म्हणाले.