औरंगाबाद : मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पुढाकार घेणार असतील तर राज्य सरकार त्यांच्या पाठीशी राहिल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. औरंगाबादमध्ये आयाोजित केलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलंय. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. 


मुंबई-नागपूर बुलेट हा प्रोजेक्ट राज्यासाठी महत्वाचा ठरेल आणि त्यामुळे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी आपले वजन वापरून त्यासाठी पुढाकार घ्यावा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. दानवे जर पुढाकार घेत असतील तर राज्य सरकार त्याच्या पाठिशी ठामपणे उभं राहिल असंही ते म्हणाले. रुळ सोडून धावू शकत नाही म्हणून मला रेल्वे आवडते असा टोला यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला. 


निजामकालीन शाळा नव्याने बांधणार
औरंगाबाद जिल्हा परिषदेकडील असलेल्या 144 निजामकालीन शाळा आणि वर्ग खोल्यांची दुरावस्था झाली असून त्या नव्यानं बांधण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.


मराठवाड्यात संताची शिकवण सांगण्यासाठी संतपीठ हवंत असं सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, पैठण येथे संतपीठाचा अभ्यासक्रम सुरू करणार असून त्याची जबाबदारी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे देण्यात येईल.  


राज्यात आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने औरंगाबाद आणि इतर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने औरंगाबाद दौऱ्यावर असून ते विविध कार्यक्रमात भाग घेणार आहेत. 


महत्वाच्या बातम्या :