पुणे : शिवसेनेचं मुखपत्र 'सामना' 16, 20 आणि 21 फेब्रुवारीला छापला जाऊ नये, अशी मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. 15 फेब्रुवारी म्हणजे आजच्या अंकात आचारसंहितेचा भंग झाला असून कारवाई करा, अशी मागणीही भाजपकडून करण्यात आली आहे. भाजपच्या या मागणीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
इंदिरा गांधींवर कोणत्या तोंडाने टीका करता?, ही आणीबाणी नाही तर दुसरं काय आहे?, सामना छापायचा नाही? आणि मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बोंबलत फिरणार काय?, पेपर छापायचा नसेल तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या तोंडातही बूच मारा, असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.
दरम्यान भाजपमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इनकमिंगवरुनही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. गृहखातं असलेल्या मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून गुंडांची यादी घेऊन त्यांना भाजपमध्ये घेतलं, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरही निशाणा साधला. मुंबईत शिवसेनाच एक नंबरला राहिल असं भाकीत पवारांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. पण शिवसेनेबद्दल वाईट कसं बोलायचं म्हणून ते असं बोलले, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
दरम्यान पुणे हे बाळासाहेबांचं जन्मस्थान आहे. एकदा तरी पुण्याच्या महापालिकेवर भगवा फडकवून पाहा, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलं.