काल, आज आणि उद्या आहे तसाच राहीन, उदयनराजेंची डायलॉगबाजी
एबीपी माझा वेब टीम | 28 Nov 2016 11:35 PM (IST)
सातारा: सातारा नगरपालिका निवडणुकीत उदयनराजे भोसले आणि शिवेंद्र राजे यांच्यात प्रमुख लढत होती. या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा सत्ता राखल्यानंतर आपली कॉलर टाईट असल्याचं सांगितलं. तसेच सत्तेत असेल किंवा नसेन, पण माझी बांधिलकी ही जनतेप्रती असल्याचेही ते यावेळी म्हणाले. सातारा नगरपालिका निवडणुकीत उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीचे 22 नगरसेवक निवडून आले, तर शिवेंद्र राजेंच्या नगरविकास आघाडीला फक्त 12 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. या विजयानंतर उदयनराजेंनी सातारकरांचे आभार मानले आहे. सातरकरांचे आभार मानल्यानंतर उदयनराजे म्हणाले की, ''लोकसभेच्या निवडणुकीत खासदार म्हणून मला मत दिलं नाही तरी चालेल, पण माझ्याविरोधात मतदान करताना एखादा सक्षम उमेदवार तरी द्या. जो तुमची प्रामाणिकपणे सेवा करेल. अन त्या उमेदवाराचा प्रचारासाठी आपण स्वत: मैदानात उतरेन.'' तसेच, शिवेंद्र राजे बारामतीच्या दावणीला बांधले गेल्याची जळजळीत टीकाही त्यांनी यावेळी केली. आपली बांधिलकी समाजाप्रती असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.