बीड : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज चौथा स्मृती दिन आहे. यानिमित्ताने बीड जिल्ह्यातील परळी इथल्या गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देताना राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भावूक झाले.


गोपीनाथ मुंडेंसोबतचे अनेक किस्से त्यांनी उपस्थितींना ऐकवले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, खासदार छत्रपती संभाजीराजे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, जलसंधारणमंत्री राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार, खासदार उपस्थति होते.

''गोपीनाथ मुंडे म्हणजे फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड''

''गोपीनाथ मुंडेंबद्दल बोलताना अनेक आठवणी डोळ्यासमोर येतात. त्यांच्या जाण्याने माझ्यासाठीच नाही, तर सर्वांसाठीच एक मोठी पोकळी निर्माण झाली. ते एक फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड होते,'' असं म्हणत उदयनराजे भावूक झाले.

''गोपीनाथ मुंडेंनी मला बोलावून मंत्रिपद दिलं''

''औरंगाबादला पक्षाची बैठक होती. ती संपल्यानंतर नाशिकमार्गे जायचं ठरवलं. नाशिकमध्ये असताना गोपीनाथ मुंडेंचा फोन आला. त्यांनी सांगितलं उद्या मुंबईला या. मी म्हटलं काही खास काम आहे का, ते म्हणाले तुम्ही या, तुम्हाला यावं लागेल. त्यांना सांगितलं काही खास असेल तर आत्ताच येतो. मुंडे साहेब म्हणाले आत्ता नको, उद्या या, तुमचा शपथविधी आहे,'' असा किस्सा उदयनराजेंनी सांगितला.

''खऱ्या अर्थाने वडिलांनंतर मला कुणी जवळ केलं असेल, तर ते मुंडे साहेब होते. त्यामुळे आज इथे छत्रपती म्हणून नाही, तर मुंडे साहेबांचा मुलगा म्हणून इथे आलोय, असं सांगत उदयनराजेंचा कंठ दाटून आला.

''गोपीनाथ मुंडेंनी कॉलर उडवायला शिकवली''

''प्रत्येकाला उत्सुकता असते, उदयनराजे कॉलर का उडवतात. त्याचं कारण सांगतो. लोकांसाठी जो माणूस झटतो आणि आयुष्यभर काम करतो, त्यालाच कॉलर उडवण्याचा अधिकार. त्यामुळे मुंडे साहेब कॉलर उडवायचे म्हणून मी देखील कॉलर उडवतो,'' असं उदयनराजेंनी सांगितलं.

''कधीही हाक मारा, तुमचाच आहे''

''गोपीनाथ मुंडेंनी कधी जात-पात मानली नाही. सर्वांना तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलं. त्यांच्या सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यांचे तेच गुण पंकजा आणि प्रितम मुंडे यांच्यात दिसून येतात. आपण म्हणतो हा श्रीमंत, तो श्रीमंत, पण आज खऱ्या अर्थाने श्रीमंत आहेत, ते गोपीनाथ मुंडेंसारखे लोक,'' असं उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, भाषणात आपण भावूक झाल्याबद्दल उदयनराजे सर्वांना सॉरी म्हणाले. शिवाय, ''कधीही मला हाक मारा, तुमचाच होतो, तुमचाच आहे आणि भविष्यातही तुमचाच असेल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही,'' असं उदयनराजेंनी सांगितलं आणि भाषण संपवलं.

VIDEO : उदयनराजेंचं भाषण