सातारा: नेहमी स्वपक्षाविरोधात दंड थोपटणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी चक्क पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीचं सारथ्य केलं.
उदयनराजे आणि शरद पवार यांच्यासोबत सातारा ते पुणे एकत्र प्रवास केला. या चित्रामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पवारांच्या गाडीचं स्टेअरिंग उदयनराजेंच्या हातात
शरद पवार आणि उदयनराजे भोसले हे पुण्यात होते. बुधवारीच पवारांचा सातारा दौरा आहे. त्यानिमित्ताने पवार आणि उदयनराजे यांची फोनवरुन चर्चा झाली. त्यानंतर चर्चा करतच साताऱ्याला जाऊ, असं उदयनराजे पवारांना म्हणाले.
मग पवारांनी उदयनराजेंना आपल्या गाडीत बोलावलं. त्यानंतर उदयनराजेंनी जो पवित्रा घेतला, तो पवारांनाही धक्का देणारा ठरला. कारण उदयनराजेंनी थेट पवारांच्या गाडीचं स्टेअरिंग स्वत:च्या हातात घेतलं आणि स्वत:च ड्रायव्हिंग करु लागले.
पुणे ते सातारा प्रवास
उदयनराजे त्यांच्या स्टाईलमध्ये थेट ड्रायव्हिंग सीटवर बसले. गाडीत पुढे शरद पवार आणि ड्रायव्हिंग सीटवर उदयनराजे हे चित्र पाहून अनेकजण अवाक् झाले.
पुढे पवार आणि उदयनराजेंचा हा प्रवास साताऱ्यापर्यंत सुरु होता. दोघांची विविध विषयांवर चर्चा झाली.
साताऱ्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर चर्चा
सध्या साताऱ्यात उदयनराजे समर्थक आणि राष्ट्रवादी समर्थकांमध्ये वादावादी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उदयनराजेंची चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
मात्र या प्रवासादरम्यान पवारांनी उदयनराजेंना कोणता कानमंत्र दिला आणि उदयनराजेंनी पवारांना काय सांगितलं, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.