औरंगाबाद : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पक्षातील्या संघर्षाला तोंड द्यावं लागत आहे. मात्र त्यांनी दसरा मेळाव्याला गर्दी जमवून सर्वांना उत्तर दिलं आहे. यातून भाजपने बोध घ्यावा, यात त्यांचाच फायदा आहे, असं पंकजांचे मामा प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.


एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत प्रकाश महाजन बोलत होते. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी ज्या पद्धतीने संघर्ष करुन नेतृत्त्व सिद्ध केलं तेच पंकजालाही करावं लागत आहे. मात्र नेता व्हायचं असेल तर हे केलंच पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

भगवानगड दसरा मेळाव्याला परवानगी कुणी नाकारली?

भगवानगडावर दसरा मेळावा घेण्यासाठी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा विरोध होता. मात्र प्रशासनानेही त्याला परवानगी नाकारली. दसऱ्याच्या दिवशी गडाला छावणीचं स्वरुप आलं होतं. सत्ताधारी पक्षाच्या एका कॅबिनेट मंत्र्यालाच सभेसाठी परवानगी का मिळत नाही, हे आपण बोलून दाखवत नसलो तरी लोकांना समजतं, असं म्हणत पंकजांना पक्षातूनच विरोध असल्याचा अप्रत्यक्ष आरोप प्रकाश महाजन यांनी केला.

राम शिंदेंवर लोकांचा रोष कशामुळे?

भगवानगड ज्या जिल्ह्यात आहे, त्या अहमदनगरचे राम शिंदे हे पालकमंत्री आहेत. मात्र दसरा मेळाव्याच्या वादात त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. परिणामी सावरगाव घाट येथे झालेल्या दसरा मेळाव्यात त्यांना लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला. ''गोपीनाथ मुंडेंनी ज्या माणसाला घडवलं, तोच माणूस पंकजांच्या सोबत नाही, त्यामुळे लोकांचा राम शिंदेंवर रोष असावा'', असं प्रकाश महाजन म्हणाले.

‘’प्रत्येक पक्षात संघर्ष असतो, भाजपातही संघर्ष आहे’’

एखादं नेतृत्त्व उभं राहत असेल तर त्याचे पाय खेचणारे चार लोक असतातच. राजकारणाचा हा एक अविभाज्य घटक आहे. नेता व्हायचा असेल तर याला तोंड दिलंच पाहिजे. शपथविधीला पंकजांना टाळ्या जास्त वाजल्या याचा राग असणारीही लोकं आहेतच, असा टोलाही प्रकाश महाजन यांनी लगावला.

‘’ओबीसी मंत्रालय पंकजांकडे न दिल्याने लोकांमध्ये नाराजी’’

नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ओबीसी मंत्रालयाची जबाबदारी पंकजांकडे द्यावी, अशी लोकांची  भावना होती. मात्र कोणतं पद कुणाकडे द्यावं हा पक्षाचा निर्णय असतो. पण पंकजा या मंत्रालयाला आणखी चांगला न्याय देऊ शकतील, असं लोकांना वाटत होतं. त्यामुळे हाचाही राग दिसून येतो. लोक मतदानातूनच राग दाखवून देतील, असं प्रकाश महाजन म्हणाले.

‘’पंकजा परीक्षा मेरिटने पास

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजांच्या वाट्याला घरामधला आणि पक्षातला संघर्ष वाट्याला आला आहे. प्रत्येकाला ही परीक्षा पास व्हावीच लागते आणि दसरा मेळाव्यानंतर पंकजा ही परीक्षा मेरिटने पास झाली आहे, असं प्रकाश महाजन यांनी सांगितलं.

संबंधित बातमी : जलसंधारण मंत्री राम शिंदे मुंडे समर्थकांच्या निशाण्यावर!