प्रतापगडावरील भवानीमातेला उदयनराजेंचं साकडं
एबीपी माझा वेब टीम | 16 Oct 2018 01:03 PM (IST)
दरवर्षी नवरात्रोत्सवात प्रतापगडावर उदयनराजे सहकुटुंब भवानीमातेची पूजा करतात.
सातारा: दसऱ्याच्या मुहुर्तावर शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी प्रतापगडावर जाऊन भवानी मातेचं दर्शन घेतलं. नवरात्रोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असलेले उदयनराजे भोसले यांच्या हस्ते प्रतापगडावर भवानीमातेची पूजा करण्यात आली. दरवर्षी नवरात्रोत्सवात प्रतापगडावर उदयनराजे सहकुटुंब भवानीमातेची पूजा करतात. दरम्यान, उदयनराजेंच्या हस्ते भवानी मातेची आरती घेण्यात आली. यावेळी शिवभक्तांनी गडावर मोठी गर्दी केली होती. सकाळी उदयनराजे भोसले हे गडावर आले तेव्हा त्यांचं स्वागत तुतारीच्या निनादात करण्यात आले. उदयनराजेंच्या हस्ते पूजा झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना भवानीमातेचं महत्व सांगितलं. दुष्काळापासून लोकांचं रक्षण करण्यासाठी आपण भवानीमातेला साकडं घातल्याचं उदयनराजे यांनी सांगितलं. यावेळी उदयनराजेंनी लोकांना दुष्काळापासून वाचायचं असेल तर झाडे लावण्याचाही सल्ला दिला. उदयनराजेंनी हात जोडून विनंती करत, झाडे तोडू नका झाडे जगवा असं आवाहन केलं. गेल्या वर्षीही उदयनराजे भोसले, त्यांची पत्नी दमयंतीराजे भोसले, मुलगी नयनताराराजे आणि मुलगा वीरप्रतापसिंह यांनी गडावर जाऊन भवानीमातेची पूजा केली होती.