सातारा : माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह 12 आरोपींची खंडणी, अपहरण आणि मारहाणीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे. साताऱ्यातील शिरवळ एमआयडीसी येथील सोना अलाईन्स कंपनीचे व्यवस्थापक राजीव कुमार दालकिशन जैन यांना उदयनराजे समर्थकांनी सातारा सर्किट हाऊस येथे खंडणीच्या कारणास्तव आणले होते.

Continues below advertisement


उदयनराजे भोसले आणि इतर 11 जणांनी राजीवकुमार जैन यांना मारहाण केल्याचा त्यांचावर आरोप होता. याबाबत राजीवकुमार जैन यांच्या तक्रारीवरून उदयनराजेंसह 12 जणांवर 23 मार्च रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात अपहरण, खंडणी, मारहाण याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात पहिल्या 11 जणांना सातारा पोलिसांनी तात्काळ अटक केली होती. शेवट उदयनराजे भोसले यांना अटक करुन त्यांना तात्काळ जामीन देण्यात आला होता.


सातारा जिल्हा न्यायालयातील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. जे. खान यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत एकूण 15 साक्षीदार तपासले गेले. त्यानंतर आज दिलेल्या निकालात उदयनराजेंसह सर्व आरोपींविरोधात पुराव्याअभावी न्यायालयाने सर्वांची निर्दोष सुटका केली.