जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील गोकुळ गावात वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून  दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. योगेश तराळ आणि अनिकेत तराळ अशी या युवकांची नावे आहेत.

काल रात्री 10 च्या सुमारास केळना नदी पात्रात ट्रॅक्टर मध्ये वाळू भरताना वाळूच्या ढिगाऱ्याजवळ खोदकाम करताना वाळूचा ढीग अंगावर कोसळला. हा ढिगारा कोसळल्याने हे दोघेही युवक त्या ढिगाऱ्याखाली खाली दबले.

दरम्यान गावकऱ्यांना ही माहिती कळताच त्यांनी या युवकांना ढिगाऱ्याखालून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच या युवकांचा वाळूखाली दबल्याने गुदमरून मृत्यू झाला.

दरम्यान या भागात अवैध वाळू उपशाबाबत नेहमी तक्रारी केल्या जात असताना प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आणि दुर्लक्षामुळे मोठा गोरखधंदा सुरु आहे. त्यातच या दुर्दैवी घटनेमुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.