नाशिक : नाशिकचा शिवराज डावरे हा चिमुकला सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरतोय आणि ह्याला कारण ठरतय ते म्हणजे त्याच्या नशिबाने त्याला दिलेली साथ. तिरा कामत, वेदिका शिंदे यांच्या पाठोपाठ नाशिक मधील शिवराज डावरे या दोन वर्षाच्या बाळालाही स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी1 या गंभीर आजाराची लागण झाली होती. मात्र त्याला तब्बल 16 कोटी रुपयांचे इंजेक्शन हे चक्क मोफत मिळाले असून यावर्षी भारतात मोफत इंजेक्शन मिळालेला शिवराज हा एकमेव लाभार्थी असल्याचा दावा डावरे कुटुंबाकडून केला जातोय.
मूळच्या सिन्नर तालुक्यातील डावरे कुटुंबासाठी 8 ऑगस्ट 2019 हा दिवस अत्यंत आनंदाचा दिवस होता कारण घरातील किरण डावरे या महिलेने शिवराज नावाच्या एका गोंडस बाळाला या दिवशी जन्म दिला होता. शिवराजचे वडील विशाल डावरे हे पूर्वी शेती करायचे आणि किरण या देखील त्यांना हातभार लावायच्या मात्र नोकरी करण्याच्या हेतूने विशाल आणि किरण हे दाम्पत्त्य शिवराजसोबत नाशिक शहरात स्थायिक झाले होते. घरात सर्व काही सुरळीत होते, बाळ घरात असल्याने घरातील वातावरणातही एक वेगळाच उत्साह होता.
शिवराजचा जन्म झाल्यापासून त्याची प्रकृती तशी निट होती मात्र जस जसे त्याचे वय वाढत गेले त्यातुलनेत त्याच्या पायाची हालचाल मात्र मंदावली होती, वयाच्या 7 महिन्यानंतरही कोणाचा हात पकडून तो उभा राहू शकत नव्हता तसेच इतर बाळांपेक्षा त्याची वर्तवणूक काही प्रमाणात वेगळी झाली होती. याबाबत नाशिकमधील दोन खासगी डॉक्टरांचा सल्ला घेतला असता शिवराजच्या विविध आरोग्य चाचण्या करण्यात आल्या आणि अखेर त्याला स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी 1 या दुर्धर आजाराची लागण झाल्याचं समजताच तसेच शिवराजचे आयुष्य हे फक्त अडीच वर्षच राहील हे समजताच कुटुंबाला धक्काच बसला. या आजारावर भारतात उपचार जरी नसले तरी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात जाण्याचा सल्ला त्यांना नाशिकच्या डॉक्तरांकडून देण्यात आला.
हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलाला वाचवण्यासाठी 16 कोटी रुपयांचे झोलगेन्समा (zolgensma) या इंजेक्शनची गरज पडेल असं सांगताच कुटुंबासमोर मोठं संकट कोसळल होते, घरदार सर्व काही विकूनही एवढे पैसे जमा होणार नसल्याने कुटुंब हतबल झाले होते. शिवराजच्या आई वडिलांनी आपल्या किडनी देखील दान करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याचवेळी हिंदुजातील प्रख्यात डॉक्टर विरेश उरानी यांच्या मदतीने अमेरिकेतील एका कंपनीशी या इंजेक्शन संदर्भात विशाल यांनी संपर्क साधत डिसेंबर 2020 ला ऑनलाईन सर्व प्रक्रिया पार पडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे क्लिनिकल ट्रायलसाठी लॉटरी पद्धतीने मोफत दिल्या जाणाऱ्या यादीत शिवराजचे नाव आले आणि इंजेक्शन तसेच इतर करांसहित असे जवळपास तब्बल 22 कोटी रुपये डावरे कुटुंबीयांचे वाचले. फक्त वीसच दिवसात ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन कुरियरद्वारे हे इंजेक्शन अमेरिकेतून हिंदुजा रुग्णालयात पोहोचले. जानेवारी 2021 च्या पहिल्या आठवड्यात हिंदुजा रुग्णालयात शिवराजला ते दिले गेले. दिलासादायक बाब म्हणजे जानेवारी ते आजपर्यंतच्या 7 महिन्याच्या काळात शिवराजच्या प्रकृतीत जवळपास 25 टक्क्याहून अधिक सुधारणा झाली असून हे सर्व काही अचानक घडलं असं म्हणत विशाल डावरे यांनी एबीपी माझाशी बोलतांना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सध्या या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला असून देवाचे ते मनापासून आभार मानत आहे. या वर्षी भारतात मोफत इंजेक्शन मिळालेला शिवराज हे एकमेव बालक असल्याचा दावा आई वडीलांकडून केला जात असून शिवराज तर नशीबवान ठरला मात्र असे आजार ईतर कोणालाही होऊ नये अशीच प्रार्थना डावरे परिवार देवाकडे करतोय.
संबंधित बातम्या :