जळगाव : मुंबईहून उत्तर प्रदेशकडे निघालेल्या दोन मजुरांचा वाटेतच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुक्ताईनगर तालुक्यातील हरतला गावाजवळ घडली आहे. मात्र या दोन्ही मजुरांना मृत्यूपूर्वी ताप आणि श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे दोघांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये राज्यभरात अनेक ठिकाणी परप्रांतीय अडकून पडले आहेत. मात्र हाताला काम नसल्याने हे मजुर मोठ्या संख्येने मिळेल ती गाडी पकडून आपल्या गावी निघाले आहेत. अनेक जण गाडी मिळत नसल्याने पायी आपलं गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाण्यातील कळवा भागात राहणारे दोन मजुरही आपल्या गावी निघाले होते. उत्तर प्रदेशच्या आझमगडमध्ये या दोघांना जायचं होतं. मात्र त्यांना जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये मृत्यूने गाठलं.


दोन्ही मजूर ट्रकने उत्तर प्रदेशात निघाले असताना वाटेतच त्यांना ताप आणि श्वसनाचा त्रास होऊ लागला. तब्येत जास्त बिघडल्याने ट्रक चालकाने दोघांनाही मधेच उतरवून दिलं. मात्र त्यानंतर त्यांना कोणतेही उपचार न मिळाल्याने रस्त्यावरच दोघांचा मृत्यू झाला. त्यांची ताप आणि श्वसनाचा त्रास ही लक्षणं पाहता त्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


मृतांचे आणि त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तर नातेवाईकांची कोरोनाच्या सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली आहे. या दोन्ही मजुरांना कोरोनाची लागण झाली असेल तर ट्रकमधील प्रवाशांनाही कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


Dharavi Migrants | धारावीतून आतापर्यंत 10 हजार मजुरांचं स्थलांतर, मूळ गावी जाण्यासाठी मोठ्या रांगा