पंढरपूर : आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला येणाऱ्या मानाच्या प्रमुख दहा पालख्यांपैकी एक पालखी सोहळ्यातील दोन वारकरी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सासवड येथून निघणाऱ्या संत चांगवटेश्वर पालखी सोहळ्यातील परवानगी प्राप्त दोन वारकऱ्यांना कोरोनाची लागण झाली झाल्याचं निष्पन्न झालं आहे. दरम्यान, या संस्थानने संबंधित भाविकांच्या संपर्कातील इतर वारकऱ्यांना ही पालखी सोहळ्यातून वगळले आहे. मंगळवारी पालखी सोहळा दहा वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरला येणार आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, यंदाच्या आषाढी यात्रेकरिता पंढरपूरला येणाऱ्या मानाच्या पालखी सोहळ्यापैकी संत चांगावटेश्वर पालखी सोहळा असून सासवड येथून पालखी मंगळवारी पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणार होती. प्रशासनाच्या नियमानुसार पालखीसोबत येणाऱ्या वीस वारकऱ्यांची यादी प्रशासनाला देण्यात आलेली होती. त्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी आणि स्वॅब टेस्टिंग केल्यानंतर दोन वारकरी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवालात समोर आलं आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यात खळबळ उडाली आहे.


कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या दोघांपैकी एक वारकरी पुरंदर तालुक्यातील खळद या गावचा असून पनवेल येथील अन्य दोन वारकऱ्यांशी त्याचा संपर्क आलेला आहे. पनवेल येथील दोघांपैकी एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. परवानगी मिळालेल्या 20 पैकी दोन वारकरी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे वारकरी संप्रदायात खळबळ उडाली आहे. चांगावटेश्वर देवस्थानने दोन वारकरी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील इतर सात वारकऱ्यांना वगळण्यात आलेले आहे. ज्या वारकऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत, असे दहा ते अकरा वारकरी सोबत घेऊन मंगळवारी पालखी सोहळा पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणार आहे.


पंढरपूरमध्ये आल्यानंतर या पालखी सोहळ्यात चंद्रभागा स्नान प्रदक्षिणा व द्वादशीच्या दिवशी परंपरेनुसार असणारी विठ्ठल भेट देण्याची परवानगी मिळालेली आहे. त्यानंतर हा पालखी सोहळा सासवडसाठी परतणार आहे. पंढरपूर शहरात ही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला आहे आणि पालखी सोहळ्यात परवानगी दिलेल्या 20 पैकी पॉझिटिव्ह निघाल्यामुळे शासनाने पालखी सोहळ्यास स्थगिती देऊन मानाच्या पालख्यांनाही मर्यादा घातल्याचा निर्णय योग्य असल्याचे बोललं जात आहे. प्रशासनाच्या या काटेकोर नियमामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात मोठी मदत झाल्याचेही दिसून येत आहे.


संबंधित बातम्या




#Coronavirus | भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण, लांडगे फडणवीसांच्या संपर्कात