मुंबई: राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षातील आमदारांची मतं फुटल्याची चर्चा असतानाच, आता युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांवर संशय व्यक्त केला आहे.


राष्ट्रपती निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे दोन आमदार फुटल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

"मला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील 2 विरोधी पक्षाच्या आमदारांनी भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मतदान केलं आहे. धक्कादायक!", असं ट्विट सत्यजीत तांबे यांनी केलं.

https://twitter.com/satyajeettambe/status/888103508930686976

https://twitter.com/satyajeettambe/status/888020880873451520

https://twitter.com/satyajeettambe/status/887149939163254784

विरोधकांच्या मतांचं गणित

दुसरीकडे विरोधकांची मतं फुटल्यानं ते धास्तीत आहेत. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिळून 6 मतं फुटलीत, तर इतर 8 विरोधकांनीही भाजपला मतदान केलं आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये नेमकी कुणाची मतं फुटली, याचीही जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

मीरा कुमार यांना महाराष्ट्रातून एकूण 77 मतं पडली. मात्र, महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदार संख्येवर नजर टाकल्यास, या दोन्ही पक्षांचे एकूण 83 आमदार आहेत. म्हणजे ही सगळी मतं मीरा कुमार यांना पडणं अपेक्षित होतं.

दुसरीकडे एमआयएम, भारिप-बहुजन महासंघ, माकप, सपा या पक्षांची एकूण 5 मतं ही मीरा कुमार यांच्याकडे झुकली असण्याची शक्यता अधिक आहे.

आता या पाच पक्षांची मतं मीरा कुमार यांना मिळाली असतील, तर मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकूण 11 मतं फुटली असा त्याचा अर्थ निघतो.

दरम्यान, राष्ट्रवादीतून हकालपट्टी झालेले आमदार रमेश कदम यांनी मतदानाच्या दिवशीच जाहीर केलं होतं की, ते रामनाथ कोविंद यांना मतदान करतील.

तर दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या कोणत्याही आमदाराने रामनाथ कोविंद यांना मत दिलं नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहे.

संबंधित बातम्या 

आमदार रवी राणांचा दावा खरा ठरला, महाराष्ट्रातील 22 मतं फुटली! 

कोविंद यांच्या विजयाने सेनेची हवा गुल, राज्यात भाजपकडे बहुमत?

रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती