लातूर : निलंगा तालुक्यातील पिरूपटेलवाडी या गावातील एक महिला आणि तिची नात या दोघी शेतामध्ये झाडाखाली थांबले असता वीज पडून ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तालुक्यातील पिरूपटेलवाडीतील ललीता नारायण इरलापल्ले (वय 59) वर्ष आणि पायल सतीष इरलापल्ले (वय 15 वर्ष) या स्वतःच्या शेतातील झाडाखाली थांबले असता अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने दोघी आजी-नात जागीच मृत्यूमुखी पडल्या. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदरील घटना आज दुपारी 4 वाजायच्या दरम्यान घडली आहे. आजी नातीचा असा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या पंधरा दिवसापासून कासारबालकुंदा, तांबाळा, मदनसुरी, हालशी, हत्तरगा, हासुरी या भागात मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. निलंगा तालुक्यातील या भागात कायमच विज पडूंन लोक दगावत आहेत. पावसाच्या माऱ्यात अनेक जनावरे ही आली आहेत. गेल्या काही दिवासात झालेल्या पावसात 18 जनावरे दगावली आहेत.
मागील पावसात विज पडून दोन लोक दगावली होती. आजच्या आजी-नातीमुळे हा आकडा चार झाला आहे. शेतीचे होणारे नुकसान वेगळे आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार याच भागात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाबरोबर माणसांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. विज पडून माणसे दगावली आहेत. परंतु, त्यांच्या वारसांना तात्काळ मदत प्रशासनाकडून मिळत नाही. अशा नुकसानग्रस्त कुटुंबियांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी जनतेतून होत आहे.