Nagpur : नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील खैरी बिजेवाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. पाचगाव येथे पाणी भरलेल्या खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खेळण्यासाठी बाहेर गेले असताना या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. खैरी बिजेवाडा पाचगाव येथील रहिवासी सात वर्षीय उत्कर्ष लोकेश लांजेवार आणि रिधान संजय सहारे अशी मृत मुलांची नावे आहेत. तर दुसरीकडे सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्यात रेल्वेच्या धडकेत दोन कामागारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
खड्ड्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू
काल संध्याकाळी घराजवळूनच काही अंतरावर असलेल्या एका खड्ड्याजवळ ते खेळत होते. दिवसभर झालेल्या पावसामुळं खड्ड्यात पाणी साचले होते. पाण्यात खेळण्यासाठी पायातील चप्पल बाहेर काढून खड्ड्यात उतरले होते. मात्र खड्डा खोल असल्याने आणि दोन्ही मुलांना खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला आहे. दोघे रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्यानं शोधाशोध सुरु झाली होती. पाण्याच्या खड्ड्याजवळ दोन्ही मुलांच्या चपला दिसून आल्या. त्यानंतर पाण्यात दोघांचा शोध घेतले असता दोघांची मृतदेह मिळून आले. संपूर्ण घटनेची माहिती रामटेक पोलिसांना देण्यात आली असून दोन्ही मुलांच्या शवविच्छेदनानंतर आज अंत्यसंस्कार झाले. दरम्यान, एकाच वेळी दोन मुलांचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
माढ्यात रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू
सोलापूर जिल्ह्याती माढा तालुक्यातून देखील एक धक्कादायक घटना समोर येत आहे. रेल्वेच्या धडकेने दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना माढा तालुक्यातील वाकाव परिसरात घडली आहे. रेल्वे रुळावरुन चालत जाणाऱ्या दोघांना रेल्वेनं धडक दिली आहे. पंढरपूर-म्हैसूर या गोलगुंबाझ एक्सप्रेसची धडक बसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. माढा स्टेशनवर उतरुन रेल्वे रुळावर चालत हे कामगार वाकावच्या दिशेने निघाले होते. यावेळी रेल्वेने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला तर तिसऱ्याने उडी मारल्याने तो बचावला आहे. दरम्यान, या अपघाताची नेमकी घटना कशी घडली याबाबतची माहिती मिळालेली नाही. रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे, एवढीच माहिती मिळाली आहे. दरम्यान, एकाच वेळी दोन कामगारांचा मृत्यू झाल्यानं माढा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या: