गोंदिया: रेल्वे ट्रॅकवर बसलेल्या मद्यधुंद अवस्थेतील दोन भावांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला आहे. ही घटना काल रात्री 11च्या सुमारास गोंदिया शहरातील अंगू बगीचा परिसरात घडली.


उमेश बीजेवार आणि अर्जुन बीजेवार अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. उमेश आणि अर्जुन दोघेही स्वागत समारंभासाठी नागपूरहून गोंदियाला आले होते. रेल्वे ट्रॅकजवळच समारंभाचं ठिकाण होतं. तिथं समारंभादरम्यान दोघांनी मद्यपान केलं आणि ट्रॅकवर जाऊन बसले आणि त्याचवेळी आलेल्या रेल्वेनं दोघांनाही चिरडलं.

बालाघाटच्या दिशेने गोंदिया कडे येणाऱ्या डेमू गाडीने काल रात्री 11 वाजेच्या सुमारास या दोघांना धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, दोघांचेही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या घटनेमुळे बीजेवार कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे.