नागपूर : नागपुरात एक वृद्ध शिक्षक दाम्पत्य त्यांच्या मृत मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी निकराचा लढा देत आहे. एकेक पुरावा गोळा करत पोलिसांनी कसा चुकीचा तपास करत प्रकरणावर पडदा टाकला हे सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. दगडालाही पाझर फुटेल अशी ही वृद्ध दाम्पत्याच्या संघर्षाची कहाणी आहे.


28 जुलै 2016 रोजी सेमिनरी हिल्स जवळच्या निर्मला हॉस्टेलसमोर अजिंक्य नासरे या 19 वर्षांच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला. ज्या ठिकाणी अजिंक्यचा मृत्यू झाला, तिथे एक पोलिस व्हॅनही होती. व्हॅनमध्ये असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनीच तक्रार नोंदवली. अजिंक्यचा मृत्यू डिव्हायडरला धडकून झाल्याचा दावा केला. पण अजिंक्यच्या मित्रांना वेगळाच संशय होता.

अजिंक्यच्या कुटुंबियांनाही शंका आली. पहिली शंका थेट पोलिस व्हॅनवर होती. मग पुरावे गोळा करणं सुरु झालं. घटनास्थळाचे फोटो गोळा केले. दुसऱ्या दिवशी पोलिसांची व्हॅन स्वच्छ धुतलेली दिसली. तरीही टायरचे निशाण घेतले आणि त्या टायरमध्ये रक्ताचे डाग दिसले.

इतकंच नाही, तर अजिंक्यच्या गाडीवर पोलिस व्हॅनच्या गाडीचा रंग दिसला. शवविच्छेदन अहवालातही त्याच्या अंगावरुन गाडी गेल्याचं आणि 18 ठिकाणी इजा झाल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी पुरावे नष्ट केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. इतकंच नाही, तर घटनेनंतर निष्क्रीयतेचा ठपकाही ठेवला.

गेल्या 9 महिन्यांपासून अजिंक्यचे कुटुंबिय परिस्थितीजन्य पुरावे घेऊन न्यायासाठी भटकत आहेत. पण त्यांच्या पदरी फक्त उपेक्षाच येत आहे. अखेर अजिंक्यच्या कुटुंबियांनी खंडपीठात धाव घेतली आणि न्यायालयानेही पोलिसांना नोटीस बजावली. तरीही पोलिस अद्याप गप्पच आहेत.