फळं खाल्ल्याने विषबाधा, दोन चिमुकल्यांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 03 May 2017 07:46 PM (IST)
बीड : सफरचंद आणि चिकू खाल्ल्याने झालेल्या विषबाधेत दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. तर आईची प्रकृती गंभीर आहे. बीड तालुक्यातील गोलांग्री गावातील ही घटना आहे. गोलांग्री या गावातील शिंदे कुटुंबात फळं खाल्ल्याने विषबाधा झाली. यामध्ये दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. साई भरत शिंदे (वय, अडीच वर्षे) आणि ओम भरत शिंदे (वय, 5 वर्षे) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहेत. ओम आणि साईची आई प्राजक्ता (26) यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. या तिघांनी काल रात्री सफरचंद आणि चिकू खाल्ले होते. त्यानंतर मळमळ आणि उलटीचा त्रास झाल्याने बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान रात्री साईचा आणि नंतर ओमचा मृत्य झाला. मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवाल आल्यावरच निष्पन्न होईल, असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.