जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नुतनी करणाचं काम सुरू असताना पुतळ्याच्या खाली असलेल्या चबुतऱ्यामध्ये दोन अस्थी कलश आढळून आल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात उघडकीस आली आहे. हे दोन्ही अस्थी कलश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. या ठिकाणी अनेकांनी या कलशाच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात सदर बाजार डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात 1958 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे, या पुतळ्याच्या खाली चाळीसगाव शहरातील शामजी जाधव घराण्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाणानंतर आणलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थी कलश हे या पुतळ्याखाली ठेवण्यात आल्याची माहिती चाळीसगाव शहरातील जुने जाणते सांगत असत, जुन्या जाणत्या लोकांची माहिती चर्चेत असताना आज पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी उत्खनन केले जात असताना या पुतळ्याच्या चबुतऱ्याखाली दोन अस्थीकलश आढळून आल्याने ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थीकलश आढळून येणे ही चाळीसगाव वासियांच्या दृष्टीने भाग्याची आणि आनंदाची बाब असल्याचं स्थानिकांनी म्हटलं आहे.
या घटनेच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने या घटनेला दुजोरा देताना म्हटल आहे की चाळीसगाव शहरात पालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची पूनरस्थापना करीत असताना या ठिकाणी दोन अस्थी कलश आढळून आले आहेत. जुन्या मंडळीच्या सांगण्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे अस्थी कलश आहेत. स्थानिक प्रशासनाने अतिशय काळजी आणि श्रद्धापूर्वक यावर नियंत्रण मिळविले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पुतळ्याच्या ठिकाणीच हे अस्थीकलश पुन्हा स्थापित करण्यात येणार आहेत. या घटनेसंदर्भात काही ऐतिहासिक दस्तावेज मिळतो का ते शोधले जाईल आणि तो आढळून आला तर जिल्ह्याच्या दृष्टीने हा अतिशय अमूल्य ठेवा असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.