जळगाव : पिस्तुलाचा धाक दाखवत 15 लाख रुपये असलेली बॅग हिसकावून फरार होणाऱ्या दोन चोरट्यांना बेड्या ठोकण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. जळगाव येथे 1 मार्च रोजी पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात ही घटना घडली होती. एमआयडीसी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने मिळून आरोपींना जेरबंद केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


दोन्ही आरोपींना उल्हासनगर येथून अटक करण्यात आली आहे. मनोज ऊर्फ खुशाल अशोक मोकळ व रितीक ऊर्फ दादु राजेंद्र राजपुत अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. दोन्ही आरोपी धुळे येथील रहिवासी आहेत. चोरी केलेल्या 15 लाख रुपयांपैकी 9 लाख 10 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. गुन्ह्यात वापरलेली पिस्तूलही पोलिसांनी जप्त केली आहे. तर उर्वरीत रकमेचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.


1 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ महेश महेश चंद्रमोहन भावसार हे त्यांच्या ताब्यातील मोटार सायकलसह 15 लाख रुपये असलेली बॅग घेऊन जात होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या ताब्यातील बॅग हिसकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांना काही जणांनी हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र पिस्तूलचा धाक दाखवून त्यांनी मोटारसायकल तेथेच सोडून हिसकावलेली बॅग घेत पलायन केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान चोरटे सोडून गेलेल्या मोटारसायकलच्या आधारे दोन चोरट्यांची नावे निष्पन्न झाली होती. त्या दोन चोरट्यांच्या शोधात दोन पथके तयार करण्यात आली होती. आरोपींच्या शोधात धुळे, सूरत, पुणे व उल्हासनगर आदी ठिकाणी तपास पथक रवाना करण्यात आले होते. अखेर उल्हासनगर येथे दोघांना पकडण्यात पोलीस पथकाला यश आले.


आरोपी मनोज ऊर्फ खुशाल अशोक मोकळ व रितीक ऊर्फ दादु राजेंद्र राजपुत हे दोघे जण उल्हासनगर नं. 1 झुलेला मंदिराजवळ असल्याची माहिती मिळाली. दोघांना तेथून ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून बॅगेतील 9 लाख 10 हजार रुपये हस्तगत करण्यात आले. उर्वरित रकमेचा तपशील तपासात निष्पन्न होणार आहे. रोख रकमेसह गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल देखील हस्तगत करण्यात आली आहे. ताब्यातील आरोपी मनोज ऊर्फ खुशाल अशोक मोकळ याच्याविरुद्ध धुळे व नाशिक येथे हत्येचा व जबरी चोरीचे सहा असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत.