बीड : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये पेच निर्माण झाला आहे. 19 जागांसाठी ही निवडणूक होत असताना तब्बल अकरा जागेवर आता एकही उमेदवार पात्र न ठरल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे काय होणार? असा प्रश्न निर्माण झालाय. विशेष म्हणजे बीड जिल्हा बँकेतील उमेदवारी भरलेल्या बड्या राजकीय नेत्यांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरल्याने आता पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. उमेदवारी अर्ज अपात्र झालेल्या यादीमध्ये धनंजय मुंडे यांचे चुलत बंधू अभय मुंडे तसेच राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे लहान बंधू विजयसिंह पंडित, रमेश आडसकर आणि सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस यांच्या उमेदवारी अर्जाचा समावेश आहे.


बीड जिल्हा बँकेवरती सध्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे वर्चस्व आहे. मात्र बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या बँकेसाठी मोठी प्रतिष्ठा पणाला लावल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 22 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यची शेवटची तारीख असताना 19 जागेसाठी 214 अर्ज दाखल झाले होते. आज जिल्हा बँकेच्या सभागृहात छाननी झाली या छाननिमध्ये सेवा सोसायटी मतदार संघातून भरलेले सर्व अर्ज बाद झाले. कारण निवडणूक लढविण्यासाठी अ किंवा ब वर्ग ऑडिट रिपोर्ट हवा असतो. मात्र ज्यांनी अर्ज भरले त्या सोसायटीचा वर्ग हा क किंवा ड असल्याने सगळ्यांचे अर्ज बाद झाले. 19 पैकी 11 जागेवरील अर्ज बाद झाल्याने उर्वरित जागेवर निवडणूक होणार की नाही अशा चर्चा सुरु झाली. विशेष म्हणजे या प्रकारे संदर्भात काही जणांनी न्यायालयामध्ये धाव घेतली असली तरी आता या बँकेवर प्रशासक येणार असं बोललं जात आहे.


एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारा पात्र होण्याची काय आहेत कारणं?


सेवा संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्यासाठी अ किंवा ब वर्गातीलच सेवा सांस्था आवश्यक असेल, या नियमाला अद्यापपर्यंत स्थगिती न मिळाल्याने बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठा पेच निर्माण झाला आहे. सेवा संस्थांच्या 11 जागांसाठी आता पात्र उमेदवार मिळणे देखील अवघड होईल, असं चित्र सध्या तरी आहे. सर्वांचे लक्ष आता छाननीकडे लागले आहे. सेवा सोसायटी मतदार संघातून निवडणूक लढविणारा उमेदवार ज्या सेवा संस्थेचा प्रतिनिधी असेल ती सेवा संस्था लेखा परिक्षणातील अ किंवा ब वर्गातील असावी असे बँकेचे नियम आहे, असं या निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी सांगत आहेत.


बीड जिल्ह्यात 735 सेवा संस्थांपैकी अवघ्या 13 सेवा संस्था लेखा परिक्षणाच्या अ किंवा ब वर्गात आहेत. म्हणूनच जिल्हा बँकेच्या उपविधीतील या नियमाला स्थगिती द्यावी अशी याचिका सहकार मंत्र्यांसमोर करण्यात आली होती. बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघात उमेदवारच नसले तरी बँका-पतसंस्था, पणन संस्था आणि इतर शेती या 3 मतदारसंघात मात्र चुरस राहणार आहे. बँका पतसंस्था मतदारसंघ हा विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघासाठी आदित्य सारडा यांच्यासह राजकिशोर मोदी, संगिता अशोक लोढा, दिपक घुमरे आदिंसह 11 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. तर पणन संस्था मतदारसंघावर अमरसिंह पंडीत गटाचे परंपरागत वर्चस्व राहिलेले आहे. या मतदारसंघात भाऊसाहेब नाटकर, आसाराम मराठे, जगदिश काळे, रामदास खाडे यांच्यासह 6 उमेदवार पात्र ठरले आहेत. तर इतर शेती मतदारसंघात देखील चांगली लढत अपेक्षित आहे.