लातूर : जुळ्या भावांचा विषय आला की आपल्याला सलमान खानचा जुडवा सिनेमा आठवतो. 90 च्या दशकात जुळ्या भावांच्या खोडकर अन् अफलातून प्रवासाची रंजक कथा सांगणारा हा सिनेमा (cinema). मात्र, या सिनेमातील गोष्टीप्रमाणेच काही जुळ्या भावांच्या आयुष्यातही सेम टू सेम गोष्टी घडत असतात. नुकतेच 10 वीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अशाच जुळ्या भावांची जुळी गुणवत्ता समोर आली आहे. जुळी भावंड म्हटलं की, ते दिसायला एकसारखी. मात्र, त्यातील एक खेळकर आणि शांत असतो, असा आपला समज आहे. मात्र त्यांच्या दिसण्यात जेवढं साधर्म्य आहे तेवढेच त्यांच्यातील गुणवत्तेतही असेल तर ते नवलच. लातूरमधील (Latur) चव्हाण बंधूचे असेच काहीसे नवल आहे. सार्थक आणि स्वप्निल चव्हाण या जुळ्यांना दहावीमध्ये (SSC) शंभर टक्के पैकी 100% मार्क पडले आहेत. ही काही त्यांची पहिली वेळ नाही हे विशेष. यापूर्वी आठवी, नववी आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील त्यांनी समान गुण घेतले होते.


लातूर शहरातील रहिवासी असलेल्या सार्थक आणि स्वप्निल सौदागर चव्हाण या जुळ्या भावंडांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेतही आपली गुणवत्ता सिद्ध केली असून, दोघा भावंडांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.लातूर शहरातील ज्ञानप्रकाश बालविकास केंद्राची सार्थक सौदागर चव्हाण आणि स्वप्निल सौदागर चव्हाण हे विद्यार्थी आहेत. सार्थकने बुद्धिबळ, तर स्वप्निलने संगीत कलाप्रकारात राज्यस्तरापर्यंत मजल मारली होती. त्यामुळे त्यांना विशेष गुणांचा लाभ मिळाला. त्यामध्ये सार्थकला ९ आणि स्वप्निलला 10 अतिरिक्त गुण मिळाले असून, दोघांनीही दहावीत 100 टक्के गुण मिळविले आहेत. दोघा भावांना 'आयआयटी'चे शिक्षण घेण्याची इच्छा आहे. वडील माजी मुख्याध्यापक, तर आई जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या या जुळ्या भावंडांचे यशही जुळंच असल्याने त्यांचे कौतुक होत आहे.


समान गुण घेण्याचा ट्रेंड


सार्थक आणि स्वप्निल यांनी दहावीतच नव्हे तर त्यापूर्वीही समान गुण घेतली होती. शिष्यवृत्ती परीक्षेत त्यांना समान गुण होते. आठवी आणि नववी मध्येही त्यांना समान गुण होते. हाच कित्ता त्यांनी दहावीच्या परीक्षेतही गिरवला आहे. आता, दहावीत ही त्यांनी समान गुण घेतले आहेत. सार्थक आणि स्वप्निल दोघेही पहिलीपासून ज्ञानप्रकाश बालविकास केंद्रात शिक्षण घेत असून, शिष्यवृत्ती परीक्षा , आठवी, नववी परीक्षांतही सारखेच गुण घेतले होते. आता दहावीतही दोघांना 100 टक्के सारखेच गुण मिळाले आहेत.


भविष्यात आयआयटी करण्याचं स्वप्न


ज्ञानप्रकाश शाळेमध्ये बालवाडीपासून ते दोघे होते. शाळेचे शैक्षणिक वातावरण, शिक्षकांचे वेळोवेळी होणारा मार्गदर्शन, घरी सातत्याने केलेला अभ्यास, यामुळे या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सविता नरहरे यांनी दिली आहे. दोन्ही मुलांनी पहिल्यापासूनच शालेय परीक्षा असतील किंवा विविध विषय असतील यात सातत्याने अग्रेसर राहण्याचं काम करुन दाखवलंय. याचा आम्हाला अभिमान आहे.. असे सार्थक आणि स्वप्निलचे वडील सौदागर चव्हाण म्हटले. आयआयटीच्या तयारीसाठी दहावीची परीक्षा झाल्यानंतर सार्थक आणि स्वप्निल हे कोटा या ठिकाणी गेले आहेत. त्यांच्याबरोबर त्याची आईही कोटा या ठिकाणी आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI