तुळजापूर : आई तुळजाभवानीच्या (Tuljapur) अभिषेकासाठी आता 50 रुपयां ऐवजी 500 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तुळजाभवानी मंदिर समितीने हा निर्णय घेतला असून याची सोमवारपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे तुळजाभवानी मातेच्या व्हीआयपी दर्शनसाठीही आता 200 रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे.


तुळजाभवानी मंदिर समितीच्या विश्वस्त कोट्यातून भाविकांना व्हीआयपी दर्शनाची मोफत मुभा यापूर्वी उपलब्ध करून दिली जात होती. त्यात आता बदल करण्यात आला आहे. या दोन्ही निर्णयांची अंमलबजावणी सोमवार 10 जुलैपासून केली जाईल, अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली आहे. 


तुळजाभवानीचे दर्शन सुलभ आणि जलदगतीने व्हावे


तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांचे उपमुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण झाले. पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबर भाविकांना सुलभ दर्शन मिळेल असे नियोजन करा अशा सूचना उपमुख्यमंत्री केल्या.  तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदीर आणि शहर परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबर भाविकांचे तुळजाभवानीचे दर्शन सुलभ आणि जलदगतीने व्हावे यासाठी प्रस्तावित तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात सुयोग्य नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.


मंदिराच्या सध्याच्या वास्तुचे जतन आणि संवर्धन, सेवा सुविधांमध्ये दर्जात्मक वाढ, मंदिर परिसर आणि शहरातील पायाभूत सुविधांचा विकास, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन सध्याच्या सोयी सुविधांचा विकास आणि विस्तार, गर्दीचे व्यवस्थापन या मुद्दांचा प्रामुख्याने प्रस्तावित आराखड्यात विचार करण्यात आला आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा 


मंदिर गाभारा आणि परिसरातील काही भागाच्या नुतनीकरण आणि दुरूस्तीच्या कामांबरोबरच वाहनतळ व्यवस्था, ऑडोटरियम, सीसीटीव्ही, नागरिक संबोधन कक्ष, वातानुकूलित सभागृहे ज्यातून दर्शन रांग पुढे जाईल व टप्प्या टप्पयाने भाविकांना मंदिरात प्रवेश मिळेल अशी व्यवस्था यासारखी कामे आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली आहेत.   तुळजापूर शहरालगत असलेल्या रामदरा परिसरात उद्यान साकारले जाणार असून येथे  कुलस्वामिनी तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देतानाचा भव्य पुतळा उभारण्याचे नियोजन आहे.  शहराच्या प्रत्येक प्रमुख मार्गावर दगडी कमानी उभारण्याचे ही आराखड्यात प्रस्तावित आहे. मंदिर, तुळजापूर शहर परिसरातील संपूर्ण भागाचा विकास करणे, धार्मिक पर्यटनाला चालना देऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधीचा विकास करण्याच्यादृष्टीने आराखड्यात कामे प्रस्ताविक करण्यात आली असल्याचे आमदार राणा जगजितसिह पाटील यांनी सादरीकरण करतांना सांगितले.