उस्मानाबाद : मंत्र्यांची बडदास्त ठेवण्यासाठी थेट देवालाच वेठीला धरल्याचा प्रकार तुळजापुरात घडला आहे. अवघ्या महाराष्ट्राची कुलदेवता असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानीची प्रक्षाळ पूजा काल चक्क एक तास उशिरानं झाली, याचं कारण म्हणजे अर्थमंत्री मुनगंटीवार.

 
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार खरंतर दुपारी 4 वाजताच तुळजापुरात येणार होते. मात्र पंढरपूरहून यायला त्यांना रात्रीचे 10. 25 वाजले. ते येईपर्यंत देवीची प्रक्षाळपूजा आणि शेजारती थांबवण्यात आली.

 
रोज 9 वाजताच होणारी प्रक्षाळपूजा 11 वाजता करण्यात आली आणि शेजारती होऊन मंदिर बंद करायला रात्रीचे साडेअकरा वाजले. वर्षानुवर्षे देवीच्या धार्मिक विधींचं हे वेळापत्रक केवळ एका मंत्र्यांच्या हजेरीमुळे बिघडलं. याबाबत भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.