वर्धा : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वर्ध्यातील समुद्रपूर येथील शाखेत रात्री दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरोडेखोरांना दोन गेट आणि सेन्सर तोडण्यात यश आलं पण तिसऱ्या दारावरील सेन्सरमुळे अलार्म वाजला आणि दरोड्याचा प्रयत्न फसला.


बँकेत शिरण्यासाठी दरोडेखोरांनी दोरीच्या सहाय्याने वरच्या मजल्यावरून चॅनल गेट तोडत तळमजल्यावरील भागात प्रवेश केला. त्यानंतर सेन्सर बंद केलं आणि सीसीटीव्हीची केबल कापली. दोन गेट गॅस कटरने कापले, मात्र तिसऱ्या सुरक्षा गेटवरील सेन्सरला स्पर्श होताच अलार्म वाजला.

आवाजाने प्रयत्न फसल्याचं समजताच हे दरोडेखोर पसार झाले. सराईत गुन्हेगार असल्याने हाताचे ठसे मिळाले नाही. तसेच सेन्सर आणि गेट तोडण्यासाठी अद्ययावत साहित्य वापरलं असल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान, समुद्रपूर पोलिसांनी पाहणी करत तपास सुरू केला आहे. सेन्सरमुळे बँक लुटण्यापासून वाचली. समुद्रपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे यांनी याबाबत माहिती दिली.