नांदेड : नुरुल हसन या 22 वर्षीय IPS अधिकाऱ्याने नांदेडमध्ये सहाय्यक पोलीस अधिक्षकाचा पदभार स्वीकारल्याची पोस्ट गेल्या काही दिवसात सोशल मीडियात तुफान व्हायरल झाली. मात्र अनेक जणांनी यावर शंकाही व्यक्त केली. या पोस्टवर स्वत: नुरुल हसन यांनीही फेसबुकवरुन या पोस्टबाबत खुलासा केला. त्याचसोबत एबीपी माझाने या पोस्टची सत्यता पडताळून पाहिली.

पोस्ट काय व्हायरल होते आहे?

नुरुल हसन हे वयाच्या 22 व्या वर्षी नांदेडमधील धर्माबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक झाले असून, ते सर्वात तरुण आयपीएस आहेत. शिवाय, त्यांच्या वयासोबतच ते 48 व्या वर्षी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होतील, अशी पोस्ट सोशल मीडियावर गेल्या काही दिवसात व्हायरल होत आहे.



वरील फोटोतले पोलीस अधिकारी म्हणजे नांदेडमधील धर्माबाद विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नुरुल हसन आहेत. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. स्वतंत्रपणे सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून काम करण्याची नुरुल यांची पहिलीच पोस्टिंग आहे. पदभार स्वीकरताच परिसरातील नागरिकांनी आणि पोलिस अधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. पण त्यानंतर या स्वागताचे फोटो वापरुन सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली ती अशी :



त्यात ही पोस्ट आणखी व्हायरल होण्यास मदत झाली ती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाच्या फेसबुक पेजवरुन. अर्थात, हे पेज नांगरे पाटलांचं अधिकृत असल्याचे कुठेही उल्लेख नाही. मात्र या पेजला हजारोंच्या घरात लाईक्स आहेत. त्यामुळे पोस्ट व्हायरल होण्यास मदत झाली.

नुरुल हसन यांच फेसबुकवरुन स्पष्टीकरण

आयपीएस अधिकारी नुरुल हसन यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टसंदर्भात स्पष्ट केले. ते म्हणाले, “मी 22 वर्षांचा असून, सर्वात तरुण आयपीएस आहे, अशा पोस्ट गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून यासंदर्भात माल अनेकांनी विचारणाही केली. मात्र, मी सर्वात तरुण आयपीएस अधिकारीही नाही आणि माझं आताचं वय 22 वर्षेही नाही.”


स्वत: नुरुल हसन यांनीच त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन त्यांच्या वयासंदर्भात खुलासा केल्याने, सोशल मीडियावर फिरणारी पोस्ट खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहेत. मात्र, तरीही एबीपी माझाने यासंदर्भात आणखी माहिती मिळवली.

एबीपी माझाच्या पडताळणीत काय समोर आले?

आम्ही या व्हायरल पोस्टची सत्यता पडताळण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आम्ही नुरुल हसन यांचे कार्यालय अर्थात धर्माबादमधील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गाढले. कार्यालयात आम्हाला नुरुल हसन भेटले नाहीत, पण त्यांची जन्म तारीख 11 जुलै 1986 असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. याचा अर्थ नुरुल हसन यांचे वय 31 वर्षे आहे.

नुरुल हसन यांचा जन्म 11 जुलै 1986 रोजी उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे झाला. अलिगढ विद्यापीठातून बीटेकची पदवी प्राप्त केल्यानंतर, त्यांनी बीएआरसीमध्ये शास्त्रज्ञ म्हणून 4 वर्षे नोकरी केली.

दरम्यानच्या काळात ते यूपीएससीची तयारी करत होते आणि 2015 साली ते यूपीएससी उत्तीर्ण झाले.

व्हायरल मेसेजनुसार, नुरुल यांचे वय 22 वर्षे असल्याचे सांगितले जाते आहे आणि 48 व्या वर्षी ते महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक असतील, असेही म्हणण्यात आले आहे. याबाबतीही आम्ही पडताळणी केली आणि संबंधितांकडून माहिती मिळवली.



बारावी इयत्तेसाठी 17 वर्षे वयाची अट आहे. त्यानंतर नुरुल यांनी 4 वर्षांनी बीटेकची पदवी मिळवली. म्हणजे बीटेक पूर्ण झाले, त्यावेळी त्यांचे वय 21 वर्षे होते. त्यानंतर 4 वर्षे ते भाभा ऑटोमिक रिसर्चमध्ये नोकरी करत होते. यूपीएससीचा काल पूर्ण होण्यासाठी 2 वर्षे लागतात.

शिक्षण, भाभामधील शास्त्रज्ञ म्हणून नोकरी, त्यानंतर यूपीएससीच्या परीक्षा, असा सारा प्रवास पाहता आणि नुरुल यांची जन्मतारीख पाहता, ते 22 व्या वर्षी IPS अधिकारी झाले, हे धादांत खोटे आहे.

नुरुल हसन 48 व्या वर्षी पोलीस महासंचालक होतील?

नरुल हसन वयाच्या 48 व्या वर्षी महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक होतील, असेही पोस्टमध्ये म्हणण्यात आले आहे. त्यासंदर्भातही आम्ही माहिती मिळवली. त्यातून काही बेसिक माहिती मिळाली, ज्यामुळे पोस्टमध्ये चुका असल्याचे तुम्हाला लक्षात येईल.

IPS झाल्यानंतर किती वर्षांनी कोणतं पद मिळतं?

  • महाराष्ट्रचे पोलीस महासंचालक होण्यासाठी 30 वर्षांची सेवा लागते.

  • थेट आयपीएस म्हणून नियुक्त झाल्यावर 14 वर्षांनी पोलीस उपमहानिरीक्षकपद मिळते.

  • थेट आयपीएस म्हणून नियुक्त झाल्यावर 18 वर्षानी पोलीस महानिरीक्षकपद मिळते.

  • थेट आयपीएस म्हणून नियुक्त झाल्यावर 25 वर्षांनी अप्पर पोलीस महासंचालकपद मिळते.

  • थेट आयपीएस म्हणून नियुक्त झाल्यावर 30 वर्षांनी पोलीस महासंचालकपद मिळते.


म्हणजेच जर नुरुल हसन 22 व्या वर्षी आयपीएस झाले असते, तरीही पोलीस महासंचालक होण्यासाठी त्यांना 30 वर्षांची सेवा व्हावी लागेल तेव्हा त्यांचे वय 52 असते. आणि एबीपी माझाच्या पडताळणीत असे समोर आले आहे की, नुरुल हसन यांचे वय 31 वर्षे आहे, त्यामुळे 48 व्या वर्षी ते महाराष्ट्राचे पोलीस महासंचालकपद मिळणे केवळ अशक्य आहे.

एकंदरीत नुरुल हसन यांच्यासंदर्भातील व्हायरल होणारी पोस्ट खोटी असल्याचे एबीपी माझाच्या पडताळणीत सिद्ध झाले.

नुरुल हसन हे 22 व्या वर्षी आयपीएस झाले नसले, तरी एक गोष्ट मात्र नक्की ते अगदी तरुण आयपीएस आहेत. त्यामुळे धर्माबादसह महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तरुणांना नुरुल हसन हे प्रेरणा देणारे ठरत आहेत.