बुलडाणा :  नागपूर-मुंबई महामार्ग क्रमांक 6 वर झालेल्या भीषण अपघातामध्ये १३ जण मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. ट्रकने महिंद्रा मॅक्झिमोला जोरदार धडक दिल्याने  झालेल्या अपघातात 13 जण जागीच मृत पावले तर तीन जण जखमीझाले आहेत. ही घटना बुलडाण्याच्या मलकापूर तालुक्यातील धरणगाव जवळ आज दुपारी घडली.


या धडकेत ट्रकने महिंद्रा मॅक्झिमोला जोरात धडक दिली.यावेळी ही गाडी ट्रकच्या खाली दाबली गेली. या भीषण अपघातात मुकुंद ढगे (वय 40 रा. अनुराबाद), छाया  खडसे (वय 37, रा.अनुराबाद), अशोक  फिरके (वय 55, रा.अनुराबाद), नथ्थु  चौधरी (वय 45 रा.अनुराबाद), आरती शिवरकर (वय 29 रा.नागझरी बहाणपूर), विरेन मिळवतकर (वय 7, रा.नागझरी बहाणपूर), सतिश  शिवरकर (वय 3), मीनाबाई बिलोरकर, किसन  बोराडे (रा.अनुराबाद), प्रकाश भारंबे (रा.जामनेर रोड भुसावळ), मेघा भारंबे असे 13 जण जागीच मृत्युमुखी पडले आहेत.

तर गोकुल भालचंद्र भिलवसकर (वय 30, रा.नागझरी जि.बहाणपूर), छगन राजू शिवरकर (वय 26, रा.नागझरी जि.बहाणपूर) हे जखमी झाले.

अपघात इतका भीषण होता की, महिंद्रा मॅक्झिमोतील 13 जण दबून ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले. मॅक्झिमो वर चढलेल्या ट्रकला काढण्यासाठी दोन क्रेनला एक तास लागला. त्यानंतर  मृतदेह आणि जखमींना बाहेर काढता आले.

अपघातातील सर्वजण मलकापूरहून अनुराबाद झोडगा गावाकडे निघाले होते अशी माहिती आहे.

अपघातानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातग्रस्त ट्रकमध्ये स्फोटक साहित्य भरलेले होते. यावेळी ग्रामस्थांचा रोष पाहता उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त लावला होता.  शहर , ग्रामीण पोलीस, हायवे पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.  या अपघातानंतर अनुराबाद गावावर शोककळा पसरली आहे.