गोंदिया : देवरी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील मसूलकशा घाटाजवळ आज सकाळी झालेल्या ट्रकच्या अपघातात एक ट्रक चालकाचा जळून मृत्यू झाला, तर दुसऱ्या ट्रकमधील चालक आणि क्लीनरने अपघात होताच घटना स्थळावरून पळ काढला.


नागपूरहून रायपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची आणि रायपूरवरुन नागपूरच्या दिशेने येणाऱ्या मिनी ट्रकची एकमेकांना धडक झाली. अपघात इतका भीषण होता की धडक होताच ट्रकला आग लागली. रायपूरच्या दिशेने येणाऱ्या मिनी ट्रकमध्ये विद्युत विभागाचे ट्रान्सफॉर्मर असल्याने ट्रकने अपघात होताच अचानक पेट घेतला.

ट्रकचालक हा ट्रकमध्ये एकटाच असल्याने आणि त्याचा पाय स्टेरिंगमध्ये अडकल्याने ट्रकमधून बाहेर पडता आले नसल्याने आग लागतचाच ट्रकचा चालक जिवंत जाळला, तर आग लागण्याने राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहातूक दोन तास थांबली. दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. लोकांना याचा त्रास सहन करावा लागला.

घटनास्थळापासून देवरी तालुका हा 5 किलो मीटर अंतरावर आहे. देवरी नगर पंचायत राष्ट्रीय महामार्गावर असून नगर पंचायतीकडे अग्निशमन दलाची गाडी नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर अशी घटना घडल्यास गोंदियावरुन 70 किलोमीटरचा अंतर ओलांडून अग्निशमन दलाचे बंब बोलावून आग विझवावी लागते. नागरिकांनी देवरी नागरपंचायतीला अग्निशमन दलाची गाडी ठेवण्याची मागणी केली आहे.

जर आज देवरी नगरपंचायतीकडे अग्निशमन दलाचे बंब असते तर कदाचित ट्रकचालकाचा जीव वाचवता आला असता.

दरम्यान, ट्रक पूर्ण जळाल्याने ट्रकचालकाची ओळख पटू शकली नाही. उशिरा पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीने उर्वरित आग विझवली. मृताची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.