शिर्डी : साईबाबा संस्थानच्या ड्रेसकोडबाबत भक्तांना आवाहन करणारे फलक लावल्यानंतर आता या फलकावरून वाद निर्माण झाला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी संस्थानने त्वरित बोर्ड हटविण्याची मागणी केली असून तो नाही हटवला तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तृप्ती देसाई यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार त्या आज शिर्डीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर आज सकाळपासून शिर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मंदिर परिसरात लावलेल्या फलकांजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिर्डी संस्थाननं केलेल्या ड्रेस कोडविरोधात आज तृप्ती देसाई थेट शिर्डीत जाऊन बोर्ड काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. अहमदनगर पोलीस त्यांना सीमेवरच रोखण्याची शक्यता आहे.
तृप्ती देसाईंच्या भूमिकेविरोधात स्थानिक शिवसेना महिला पदाधिकारी आणि शिर्डीच्या ग्रामस्थांनी कडक भूमिका घेतली आहे. धार्मिक स्थळांना भेट देताना काही संकेत पाळणं गरजेचं आहे त्यामुळे तृप्ती देसाईंना धडा शिकवू असं म्हटलं आहे. अहमदनगर पोलिसांनी संघर्ष टाळण्यासाठी तृप्ती देसाई यांना 8 ते 11 डिसेंबरपर्यंत शिर्डीत येण्यास मज्जाव केला आहे. त्यानंतरही तृप्ती देसाई या शिर्डीला जाण्यावर ठाम आहेत.
शिर्डी फलक वादात ग्रामस्थ संस्थानच्या पाठीशी, सर्व व्यावसायिक आता आवाहन फलक लावणार
तृप्ती देसाईंच्या इशाऱ्यानंतर आता शिर्डीत फलकाचे राजकरण तापू लागले असून देसाई यांना विरोध करण्यासाठी विविध हिंदू संघटना सक्रिय झाल्या आहेत. ब्राम्हण महासंघाचे आंनद दवे आपल्या कार्यकर्त्यांसह शिर्डीत दाखल झाले असून तृप्ती देसाई शिर्डीत आल्या तर जशास तसे उत्तर देण्याचा इशारा ब्राम्हण महासंघाने दिला आहे.
साई मंदिरात दर्शन करायला येताना भारतीय पोशाखात यावं अथवा सबाह्य कपडे घालावे असं आवाहन करणारे फलक मंदिर परिसरात दोन दिवसापूर्वी लावले आहेत. हा निर्णय खूप पूर्वीचा असला तरी केवळ फलक लावल्यानं आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी 10 डिसेंबरला शिर्डीत येऊन फलक काढण्याचा इशारा दिल्यानंतर आता शिर्डीत ग्रामस्थांसह विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून भविष्यात तृप्ती देसाई यांनी असं काही केल्यास जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय घेतलाय. एकीकडे संस्थानच्या या निर्णयाचा ज्या साई भक्तांवर याचा परिणाम होणार आहे, त्यांनी मात्र आपल्या प्रतिक्रिया देताना काहींनी स्वागत केलं आहे. तर काहींनी हा निर्णय चुकीचा वाटतो. मात्र अशा आवाहनामुळे राजकारण करु नये अशीही भावना भक्तांनी बोलून दाखवली आहे.
तृप्ती देसाईंच्या इशाऱ्यानंतर शिर्डी ग्रामस्थ आक्रमक, ड्रेसकोड फलकाचा वाद चिघळण्याची शक्यता
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी साई दर्शन घेतले असून हा निर्णय सक्तीचा नसून आवाहन असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी भक्तांनी या आवाहनाला प्रतिसाद देण्याचं आवाहन करत एक प्रकारे समर्थनचं केलं आहे. याबाबत साई संस्थानच्या वतीनं पहिल्या दिवसापासून ही सक्ती नसून आवाहन असल्याचं सांगितलं असून भाविकांनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर असे आवाहनचे फलक लावले असल्याचं स्प्ष्ट केलं आहे. मात्र तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाबाबत काही बोलण्यास साई संस्थानच्या वतीनं नकार दिला होता.