नाशिक : आपल्या हक्कासाठी तब्बल चार दिवसांपासून पायपीट करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना डांबण्याचा पराक्रम नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलिसांनी केला. या विद्यार्थ्यांची बाजू जाणून घेत असलेल्या एबीपी माझाच्या प्रतिनिधींनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली आणि कॅमेराची तोडफोड करण्यात आली.
आदिवासी विद्यार्थ्यांवर मोर्चा काढण्याची वेळ का आली हे जाणून घेण्यासाठी आम्ही नाशिकच्या शासकीय आदिवासी वसतिगृहाचा आढावा घेतला. त्यात प्रशासनाचा नाकर्तेपणा उघडकीस आला. शिवाय समोर आलेल्या धक्कादायक वास्तवामुळे कुणाचाही संताप होईल.
मुलींच्या वसतिगृहाला खिडक्या नाहीत
मुलीच्या वसतिगृहाच्या इमारतीच्या सर्व खिडक्या तुटल्या आहेत. त्यावर मुलींनी कपडे-टॉवेल टाकून खिडक्या झाकल्या आहेत. वसतिगृहाच्या इमारतीच्या मुख्य दरवाजाला भलंमोठं भगदाड पडलंय, त्यातून अनेकवेळा चोर आत प्रवेश करतात आणि चोऱ्या होतात असल्याचं मुलींचं म्हणणं आहे. मात्र याकडे लक्ष देण्यासाठी कुणालाही वेळ नाही.
मुलांना खायला अन्न नाही
मुलांच्या वसतिगृहाची अवस्था तर आणखी बिकट आहे. छत गळतंय, भिंतींना ओल आल्याने मुलांना स्वतः रंगकाम करावं लागतंय. तीन-तीन दिवस बिस्कीट खाऊन झोपावं लागतंय. इमारतीवर सोलार पॅनल आहे, मात्र सुरुवातीचा कालावधी वगळता त्याचा वापर झालेला नाही. मोडकळीस आलेल्या पॅनलची ऊब नेमकी कोणी घेतली, लाखो रुपयांचा पैसे जातो कुठं असा सवाल उपस्थित होत आहे.
आपल्या समस्या सांगताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. मोर्चे काढण्यापासून रोखणाऱ्या पोलीस आणि सरकारने विद्यार्थ्यांना कुठल्या अवस्थेत रहावं लागतंय, ते पाहायला हवं.
सुटकेनंतरही पोलिसांचा मुलांना त्रास
आपल्या विविध मागण्यांसाठी निघालेला आदिवासी विद्यार्थ्यांचा पायी लाँग मार्च काल नाशिक आणि नगर पोलिसांनी एकत्रित कारवाई करत नांदूर शिंगाटे गावात दडपशाही करत अडवला.
यानंतर मोर्चात सहभागी असणाऱ्या मुलांना आणि मुलींना पुण्याला हलवण्यात आल. पोलिसांनी आज दुपारी या मुलांची सुटका केली असून वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात सोडण्यात आलं, तर बाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या-त्या भागातील पोलीस ठाण्यात आणून पालकांच्या स्वाधीन करणात आलं.
या पायी लाँग मार्चच्या आयोजनात असणारा मदन पथवे याला संगमनेर पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केलं. मात्र सुटका झाल्यानंतरही पोलिसांनी त्रास दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
आदिवासी मुलांवर बिस्कीट खाऊन, पाणी पिऊन राहण्याची वेळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jul 2018 06:15 PM (IST)
आदिवासी विद्यार्थ्यांवर मोर्चा काढण्याची वेळ का आली हे जाणून घेण्यासाठी आम्ही नाशिकच्या शासकीय आदिवासी वसतिगृहाचा आढावा घेतला. त्यात प्रशासनाचा नाकर्तेपणा उघडकीस आलाय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -